पुण्यात सिग्नलवर वाहनचालकांचं लक्ष विचलित करून मोबाईल व मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या ‘टक-टक’ गँगचा पर्दाफाश करण्यात पुणे गुन्हे शाखेला यश आलं आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने ही कारवाई केली. आरोपी सिग्नलवर किंवा गर्दीच्या ठिकाणी चारचाकी वाहनावर मुद्दाम ‘टक-टक’ करत चालकाचं लक्ष वेधून घेत असत. वाहनाने धडक दिल्याचा बहाणा करून वाद घालताना चालकाचं लक्ष दुसरीकडे वळवले जात असे आणि त्याचवेळी कारमधील मोबाईल फोन व इतर मौल्यवान वस्तू चोरी केल्या जात होत्या.
लॉजमध्ये येणार असल्याची माहिती
याप्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास सुरू केला. दरम्यान, आरोपी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि दोन संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ओमप्रकाश कोहली (वय 38) आणि अफझल कय्युम अब्बासी (वय 38) अशी असून ते दोघेही मेरठ येथील रहिवासी आहेत.
‘गाडी पायावर गेली’
चौकशीत दोघांनी फरासखाना परिसरातील मोबाईल चोरीची कबुली दिली. तसेच कर्वे रोड परिसरात उभी असलेल्या कारमधून आयफोन व रोख रक्कम चोरी केल्याचेही उघड झाले. आणखी एका घटनेत विमान नगर चौक येथे कारचालकाला ‘गाडी पायावर गेली’ असा बहाणा करून सॅमसंग व वनप्लस कंपनीचे मोबाईल लंपास केल्याची माहिती समोर आली. शहरातील फरासखाना, अलंकार आणि विमाननगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा प्रकारचे अनेक गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव आणि त्यांच्या पथकाने केली. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.
