मुलगाच हवा या हट्टापायी पोटच्या गोळ्याची हत्या करण्याचा संतापजनक प्रकार नारेगाव परिसरात उघडकीस आला आहे. एका 26 वर्षीय विवाहितेचा तिच्या संमतीशिवाय घरातच बळजबरीने गर्भपात करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी मोठी कारवाई करत, गर्भपाताचे रॅकेट चालवणारा कुख्यात डॉक्टर, एक परिचारिका आणि पीडितेच्या पतीसह सासू-सासऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. डॉ. सतीश सोनवणे कुख्यात रेडिओलॉजिस्ट आणि मुख्य सूत्रधार अरबाज सय्यद पीडित विवाहितेचा पती, फिरोज सय्यद सासरा, आशिया सय्यद सासू, कमल तिनगोटे परिचारिका आणि अनिल जाधव लॅब चालक अशी आरोपींची नावे आहेत.
विवाहितेला गुंगीचं औषध दिलं
या घटनेतील मोठी बाब म्हणजे हे संपूर्ण रॅकेट अत्यंत छुप्या पद्धतीने चालवले जात होते. पीडित विवाहितेच्या पतीने डॉ. सतीश सोनवणे याला गर्भपातासाठी सुपारी दिली होती. डॉ. सोनवणे याने ट्रिमरच्या आकाराच्या एका पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा वापर करून विवाहितेच्या घरातच तिचे बेकायदेशीर गर्भलिंग निदान केले. पोटात मुलगी असल्याचे स्पष्ट होताच, सासरच्या मंडळींनी डॉक्टर आणि एका परिचारिकेच्या मदतीने तिचा गर्भपात करण्याचा घाट घातला. 6 मार्च रोजी विवाहितेला गुंगीचं औषध देऊन तिचा गर्भपात करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, याचदरम्यान विवाहितेचे वडील अचानक तिथे पोहोचले. त्यांना पाहताच डॉक्टर आणि त्याचे साथीदार साहित्य सोडून पसार झाले. मात्र, तोपर्यंत विवाहितेचा गर्भपात झाला होता. प्रकृती खालावल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे हाती लागले.
कुख्यात डॉक्टरचे जाळे सिल्लोड ते बीडपर्यंत
अटक करण्यात आलेला डॉ. सतीश सोनवणे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही गर्भपाताचे चार गुन्हे दाखल आहेत. मे 2024 मध्ये त्याला मोठ्या रॅकेटसह अटक करण्यात आली होती. मात्र, जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा आपले जाळे विणले. जालना, सिल्लोड आणि बीडपर्यंत हे रॅकेट पसरलेले असून, 3 ते 5 लाख रुपयांच्या मोबदल्यात हा काळाबाजार सुरू होता. न्यायालयाने सर्व आरोपींना 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
