दर्शन घेतलं अन् पुढे निघाले…
मिळालेल्या माहितीनुसार, कामठीच्या कचरीपुरा परिसरातील महादेव ऋषी पारसे (वय 52) हे आपल्या कुटुंबीयांसह राजस्थानातील खाटू श्याम बाबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. 6 मार्च 2026 रोजी मध्यरात्री ते तवेरा कारने कामठीतून निघाले होते. त्यांच्यासोबत पत्नी कांता महादेव पारसे (वय 45) आणि मुलगा घनश्याम महादेव पारसे (वय 22) तसेच इतर नातेवाईक प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांनी उज्जैन येथे महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर राजस्थानकडे निघाले.
दरम्यान, 11 मार्च रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास जयपूर मार्गावरील सालासर रोड परिसरात त्यांच्या तवेरा वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात महादेव पारसे, त्यांची पत्नी कांता पारसे आणि मुलगा घनश्याम पारसे गंभीर जखमी झाले.
त्रिकोणी कुटुंबाचा जागीच अंत
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत सर्व जखमींना जवळच्या सालासर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महादेव पारसे, कांता पारसे आणि घनश्याम पारसे यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेत चालक मनोज चिंदमवार यांच्यासह आराधना पारसे, पायल पारसे, पल्लवी पारसे, पुनम पारसे, तुषार पारसे आणि पवन बागडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघाताची माहिती बुधवारी रात्री कामठी येथे पोहोचताच कचरीपुरा परिसरात मोठी खळबळ उडाली. पारसे कुटुंबाच्या घरासमोर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. एकाच कुटुंबातील आई-वडील आणि मुलाचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पारसे कुटुंबीयांचे नातेवाईक आणि सुरादेवी (कोराडी) येथील माजी सरपंच सुनील दूधपचारे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. सध्या मृतदेहांचे सालासर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत असून त्यानंतर तिन्ही मृतदेह कामठी येथे आणण्यात येणार आहेत. या दुर्घटनेमुळे पारसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
