मांजराने पोपटाचा पिंजरा पाडला, पुण्यातील दोन शेजाऱ्यांचा वाद हाणामारीपर्यंत, मांजर मालकावर गुन्हा

मांजर आणि पोपटाचा वाद आपण गोष्टींमध्ये ऐकला असेल पण हा वाद घडला पुण्यात आणि याची खबर गेली पोलीस स्टेशनपर्यंत. पुण्यातील ताडीवाला रोड परिसरामध्ये भारत तरुण मंडळासमोर मांजर आणि पोपटामुळे दोन शेजाऱ्यांमध्ये चांगलाच वाद रंगला आणि त्याचे रूपांतर झाले हाणामारीमध्ये. या प्रकरणी मांजरीचा मालक दिनेश रंगराव पोताबत्तोनी याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक सिंग हे ताडीवाला रस्त्यावर कुटुंबासह राहतात. त्यांनी घरात पोपट पाळला असून त्याचा पिंजरा घरासमोर ठेवलेला असतो. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दिनेश पोताबत्तोनी यांनी मांजर पाळले आहे. हे मांजर परिसरात मोकळेपणाने फिरत असल्याने ते वारंवार सिंग यांच्या घरासमोर येऊन पोपटाच्या पिंजऱ्याशी चाळे करत होते.

अनेकदा त्या मांजरीने पोपटाचा पिंजरा ढकलून दिल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे सिंग यांना त्याचा त्रास होत होता. याबाबत त्यांनी दिनेश यांना मांजरीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. मात्र याच गोष्टीचा राग येऊन दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली.

 

तोंडी वादाचं हाणामारीत रुपांतर

सुरुवातीला दोघांमध्ये तोंडी वाद झाला. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यही यात सहभागी झाले आणि पाहता पाहता वाद वाढत गेला. काही वेळातच दोन्ही बाजूंचे लोक रस्त्यावर आले आणि एकमेकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करू लागले. त्यानंतर या वादाचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले.

या मारहाणीत अभिषेक सिंग यांना दुखापत झाली. त्यामुळे त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत मांजरीचा मालक दिनेश रंगराव पोताबत्तोनी याच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मांजर आणि पोपटामुळे शेजाऱ्यांमध्ये एवढा मोठा वाद झाल्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *