पुण्यातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर डबल डेकर उड्डाणपू उभारण्यात आला आहे. 8 मार्च रोजी, रविवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पन करून वाहतुकीसाठी हा पूल खुला करण्यात आला. या दुमजली (Double Decker) उड्डाणपुलामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीची समस्या मोठा प्रमाणात कमी होणार आहे अशी अपेक्षा आहे. पण काही कारणांमुळे या उड्डाणपुलावर प्रवास करताना वाहनचालकांचा गोंधळ उडत असून, हा प्रवास त्यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरत आहे.
दिशादर्शक फलक नाहीत
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा डबल डेकर पूर उभारण्यात आला आहे. या पुलामुळे विद्यापीठ मार्गासह पाषाण, बाणेर, औंध आणि शिवाजीनगर या भागांना जोडणाऱ्या मार्गांवरील वाहतूककोंडीही कमी होण्याची अपेक्षा आहे. या उड्डाणपुलाचा एक भाग विद्यापीठ चौक म्हणजेच आनंद ऋषी चौकातून जातो. या भागांत वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. मात्र या ठिकाणी आवश्यक दिशादर्शनक फलक आणि वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे.
काँक्रीट डिव्हायडर रस्त्यावरच
या उड्डाणपुलाचा काही भाग नागरिकांसाठी सुरू करण्यात आला असला तरी कोणत्या मार्गाने जायचे याबद्दल स्पष्ट माहिती दिली गेली नाही. यामुळे वाहनचालकांना अनेकदा लेन बदलावा लागत असून त्यामुळे चौकात पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत असून वाहनचालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. उड्डाणपुलाच्या बांधकामावेळी काही ठिकाणी वाहतूक वळवण्यासाठी काँक्रीटचे डिव्हायडर बसवले होते. त्यापैकी गणेशखिंड रस्ता ते पाषाण या मार्गावर काही ठिकाणी हे डिव्हायडर अजून तसेच असून वाहनचालकांची मोठी गैरसोय होते आहे. यामुळे रस्ते अरुंद झाल्याने संध्याकाळी वाहतूककोंडी होत आहे.
पीएमआरडीएने उभारलेल्या या दुमजली उड्डाणपुलाच्या एका भागावर वाहतूक तर दुसऱ्या भागावर मेट्रो मार्गिका असणार आहे. पुणे मेट्रो लाइन 3 ही मार्गिका या पुलावरून जाणार आहे. हा उड्डाणपूल 1.7 किमी लांब असून, योग्य मार्गदर्शन झाल्यास पुणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे.
