बुलढाण्यात पतीनेच आपल्या शिक्षक पत्नीची हत्या केल्याचं उघड झालं आहे. पतीनेच पत्नीची सुपारी देत अपघात घडवून आणला होता. एका भीषण अपघाताच्या नावाखाली हत्येचा हा कट लपवण्यात आला होता. इतकंच नाही तर त्याने याआधी पत्नीच्या हत्येसाठी तीन वेळा विषप्रयोग केला होता. पोलिसांनी तपास करत हा कट उघडकीस आणला आहे. यानंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहे.
एका भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा थरारक कट उघडकीस आणण्यात जळगाव जामोद पोलिसांना मोठे यश आलं आहे. किरकोळ अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात 1 लाखांची सुपारी देऊन घडवून आणलेला कट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा अत्यंत शिताफीने तपास लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
२ मार्च रोजी सकाळी जळगाव जामोद तालुक्यातील कवठळ गावाजवळ एका पांढऱ्या रंगाच्या गाडीने शाळेत जाणाऱ्या शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात वाटत होता, मात्र जळगाव जामोद पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि सत्य समोर आले.
पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने तपास केला असता तपासादरम्यान संशयाची सुई पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा (एमएच 28 बीबी 5753) गाडीकडे वळाली. ही गाडी शेगावच्या मनीष सुर्यवंशीची असल्याचं समजल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी मनीषने कटाची कबुली दिली आहे. मनिषने दिलेल्या कबुली जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मृतक महिलेचे पतीसोबत कोणत्या ना कोणत्या कारणावरून अनेकदा कौटुंबिक वाद व्हायचे. तिने पोलिसांत याप्रकरणी तक्रारही दिली होती. हाच राग डोक्यात धरुन आरोपी पतीने हत्येचा कट रचला होता. मृत वृषाली यांचा पती प्रकाश अनंता गावंडे आणि त्याचा साथीदार मंगेश चुलकार यांनी मिळून हा कट रचला असल्याची माहिती मिळाली आहे.
वृषाली यांना अन्नातून विष देऊ मारण्याचा तीन वेळा प्रयत्न झाला होता, मात्र तो यशस्वी झाला नसल्याचे धक्कादायक वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपींनी मनिष सुर्यवंशी याला वृषाली यांना गाडीने उडवण्यासाठी 1 लाखांची सुपारी दिली होती. ठरल्याप्रमाणे 2 मार्चच्या सकाळी मनिषने वृषाली यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि मागून कट मारून त्यांना खाली पाडले, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या गुन्ह्यात वाहन चालक मनीष सुर्यवंशी, मध्यस्थ मंगेश चुलकार आणि पती प्रकाश अनंता गावंडे या तिघांनाही पोलिसांनी आरोपी केले असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 61(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही अटक करून न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मृतक वृषाली गावंडे पिंपळगाव काळे येथील शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या..दरम्यान त्यांचा अपघात नसून खून झाल्याच्या घटनेने सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या घरातील शिक्षक पत्नीचा खून करणाऱ्या पतीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे..
