इराण-इस्त्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. बंगळुरु, चेन्नई आणि मुंबईतील हॉटेल उद्योगावर आता त्याचा परिणाम दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, हॉटेल उद्योगांसमोर संकट निर्माण झालं आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे पुरवठा खंडित झाला असून बंगळुरु, चेन्नई आणि मुंबई येथील हॉटेल आणि रेस्तराँ उद्योगांनी व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची कमतरता जाणवत असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान केंद्राने तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजीचं उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
आहार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील जवळपास 20 टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत. परिस्थिती कायम राहिल्यास आगामी दिवसांत परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
एलपीजीच्या किंमतीत वाढ
इराण-इस्रायल-अमेरिका युद्ध आणि त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीसह प्रमुख ऊर्जा वाहतूक मार्गांमध्ये झालेल्या व्यत्ययामुळे शनिवारी एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचे दर 60 रुपयांनी आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर 115 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.
मुंबईतील हॉटेल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
मुंबईतील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रालाही ऊर्जा संकटाचा सामना करावा लागत आहे, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या तीव्र कमतरतेमुळे सुमारे 20 टक्के हॉटेल्स आणि रेस्तराँना त्यांचं कामकाज बंद करावे लागले आहे. दादर, अंधेरी आणि माटुंगा सारख्या भागातील प्रतिष्ठित रेस्तराँनी आधीच त्यांच्या मेनूमध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे. दाल मखनी किंवा रवा डोसा सारखे हळूहळू शिजवलेले पदार्थ वगळण्यास सुरुवात झाली आहे. उरलेले गॅस साठे वाचवण्यासाठी त्यांनी त्यांचे कामकाजाचे तास देखील कमी केले आहेत.
काही रेस्तराँ चालकांनी गॅसपुरवठा सुरु तोपर्यंत ग्राहकसेवा सुरु ठेऊ मात्र, त्यानंतरचे कोणतेच नियोजन नसल्याचे सांगितलं आहे. याबाबत हॉटेल व्यवसायिकांच्या आहार संघटनेकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिले जात नसल्यानं गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
आहार संघटनेने घेतली छगन भुजबळ यांची भेट
आहार संघटनेने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. गॅस पुरवठा पूर्णपणे बंद करू नये अशी मागणी त्यांनी निवेदन देत केली आहे. LPG पुरवठादार जास्तीत जास्त 25 टक्के कपात झाली तरी उद्योग काही प्रमाणात त्याचे व्यवस्थापन करू शकतो. 100 टक्के पुरवठा बंद केल्यास हॉटेल्स व रेस्तराँ आपले व्यावसायिक कामकाज चालू ठेऊ शकणार नाही. त्यामुळे किमान आवश्यक एलपीजी पुरवठा सुरू राहील यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणी आहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
संभाजीनगरमधील उद्योगांना फटका
छत्रपती संभाजीनगरमध्ये एलएनजीच्या तुटवड्याचा उद्योगांना फटका बसला असून, एलएनजीअभावी 5 मोठ्या उद्योगांचं उत्पादन ठप्प झालं आहे. एमआयडीसीमधील आणखी उद्योग ठप्प होण्याची शक्यता आहे.
शेंद्रा, वाळूज, चिखलठाण्यातही ऑटोमोबाईललाही गॅस तुटवड्याचा फटका बसत आहे. याशिवाय एलएनजीच्या तुटवड्यामुळे स्टील कंपनीत युनिट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
पुण्यातील 22 गॅस दाहिन्या बंद
आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा कमी झाल्याने पुणे महापालिकेच्या स्मशानभूमींतील 22 गॅस दाहिन्या बंद ठेवाव्या लागल्या आहेत. वैकुंठ स्मशानभूमीतील तीन दाहिन्यांसह शहरातील इतर 19 दाहिन्या गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. याठिकाणी दररोज सुमारे २० ते २२ पार्थिवांवर अंत्यसंस्कार होत होते. केंद्र सरकारने घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिल्याने व्यावसायिक गॅस कमी झाला आहे. गॅस पुरवठा सुरळीत झाल्यानंतर दाहिन्या पुन्हा सुरू करण्यात येतील.
कोल्हापुरात गॅस सिलेंडर घेण्यासाठी गर्दी
इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन टंचाईची भीती व्यक्त केली जात असताना कोल्हापुरातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. घरगुती गॅस सिलेंडर भडकण्याची किंवा पुरवठा कमी होण्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर शहरातील राजारामपुरी इथे असणाऱ्या गॅस एजन्सी समोर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी एजन्सीच्या दारात लांबच लांब रांगा लावल्या. आपल्याला वेळेत गॅस मिळावा यासाठी अनेक जण सिलेंडर घेण्यासाठी घाई करताना दिसले.
