उन्हाच्या वाढत्या पाऱ्यासह ‘एसी लोकल’मध्ये फुकटेही वाढले! मध्य रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांमध्ये 23 टक्के वाढ

उन्हाचा पारा वाढत असताना मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित (एसी) लोकलकडे प्रवाशांचा कल वाढत आहे. एसी लोकल विलंबाने धावत असूनही उन्हाचा ताप टाळण्यासाठी प्रवासी एसी लोकलची वाट पाहात फलाटावर ताटकळतात. परिणामी, एसी लोकलमधील विनातिकीट प्रवाशांचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या एसी लोकलमधील विनातिकीट प्रवाशांच्या संख्येत २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

‘वाट पाहीन, पण एसी लोकलनेच जाईन’

होळीनंतर तापमान चढू लागल्याने त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. दुपारच्या वेळेत उन्हाच्या झळा सहन करत प्रवाशांना लोकलप्रवास करावा लागतो. त्यामुळे एसी लोकलची संख्या वाढू लागली आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गापाठोपाठ हार्बर मार्गावर एसी लोकल धावू लागली आहे. मात्र एसी लोकल प्रचंड विलंबाने धावत असूनही केवळ उन्हाचा त्रास कमी व्हावा, यासाठी प्रवासी ‘वाट पाहीन, पण एसी लोकलनेच जाईन,’ असे म्हणत वातानुकूलित गाडीला पसंती देत आहेत.

मध्य रेल्वेवर एप्रिल २५ ते फेब्रुवारी २६ या कालावधीत दररोज सरासरी ४०१ फुकट्यांवर कारवाई करून सरासरी १.२७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आत्तापर्यंत एकूण एक लाख दहा हजार प्रवाशांकडून ३.५१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ८९ हजार ७९९ विनातिकीट प्रवासी सापडले होते. यंदा प्रवासीसंख्येत २३ टक्के तर, दंडाच्या रकमेत १८ टक्के वाढ झाली आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर सध्या ९४ वातानुकूलित लोकलफेऱ्या चालवल्या जात असून त्यापैकी १४ नुकत्याच हार्बर मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलमधून एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एक लाख १६ हजारांहून अधिक प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला. त्यांच्याकडून ३.७६ कोटी रुपये वसूल करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *