जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक, राष्ट्रवादीने पहिल्यांदाच अर्ज मागवले, नेत्यांचे नातेवाईकही स्पर्धेत

 जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पदांसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने यंदा प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसने थेट अर्ज मागविले आहेत. ज्येष्ठ सदस्यांपैकी अनेकांनी थेट अध्यक्षपदांवर दावा केला असून, काहींनी दोन्ही पदांपैकी एकाची मागणी केली आहे. त्या अर्जांवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार निर्णय घेणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. येत्या १८ मार्चला या निवडणुका होतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची नुकतीच बैठक झाली. गेल्या आठवड्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पदाधिकारी निवडीचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने थेट अर्ज मागविले आहेत. त्यानुसार इच्छुकांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे अर्ज दाखल केले आहेत.

दौंड तालुक्यातून ज्येष्ठ सदस्य वीरधवल जगदाळे, माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात; तसेच भोरमधून विक्रम खुटवड यांनीही अध्यक्षपदासाठी मागणी केली आहे. बारामतीचे करण खलाटे यांनी दावा केला आहे. आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील, मुळशीतून शांताराम इंगवले यांनी अध्यक्षपदासाठी दावा करताना उपाध्यक्षपदही द्यावे, अशी मागणी केली. ज्येष्ठ सदस्या सुजाता पवार आणि मोनिका हरगुडे; तसेच इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनीही उपाध्यक्षपदासाठी मागणी केली. मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी निवडून आले आहेत. त्यामुळे एक पद मिळावे, यासाठी आमदार सुनील शेळके आग्रही आहेत.

इच्छुकांची संख्या अधिक

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आतापर्यंत दोन्ही पदांसाठी अडीच अडीच वर्षे संधी देण्याची पद्धत होती. मात्र इच्छुकांमुळे यंदा सव्वा सव्वा वर्षे कार्यभार करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय जाहीर केला नाही. मात्र, सर्व सदस्यांना खूष ठेवण्यासाठी सव्वा वर्षे देण्याची नवी पद्धत अंमलात येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *