स्वारगेट आणि मार्केट यार्ड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून टोळीयुद्ध पुन्हा डोके वर काढत आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये सुरू असलेल्या वादातून वारंवार हल्ले आणि फायरिंगच्या घटना घडत असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या घटनांमुळे स्वारगेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नव्याने उदयास येत असलेल्या या टोळ्यांना आताच जरब बसविण्याची गरज व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलांनीच भर रस्त्यात फायरिंग करून धुमाकूळ घातल्याची घटना घडली होती. त्याच घटनेचा बदला घेण्यासाठी शुक्रवारी (६ मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा गोळीबार करण्यात आला. यात मोझेस मल्लिकार्जुन शेकापुरे (रा. काकडे वस्ती, कोंढवा) याच्या पाठीत गोळी लागून तो जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोझेस शेकापुरे, त्याचा भाऊ सागर शेकापुरे आणि त्यांचा मित्र निखिल लगाडे हे महर्षीनगर येथे शिवजयंती उत्सव पाहून दुचाकीवरून घरी जात होते. रात्री ११.२० ते ११.३० च्या दरम्यान वखार महामंडळ चौक ते गंगाधाम चौक रोडवरील बन्सीलाल नेमीचंद ओस्तवाल यांच्या दुकानासमोर काही आरोपींनी त्यांचा पाठलाग करून पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मोझेस जखमी झाला, तर आरोपी घटनास्थळावरून फरारी झाले.
या प्रकरणी सागर शेकापुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेतील मुख्य आरोपी आणि जखमी दोघेही स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांतच दोन वेळा फायरिंगच्या घटना घडल्याने नागरिक अस्वस्थ आहेत. काही महिन्यांपूर्वीही सराईत गुन्हेगारावर हल्ला झाला होता. त्या वेळीही हल्ल्यासाठी पिस्तूल बाहेर काढले होते. मात्र, त्यातून गोळी न सुटल्याने मोठा अनर्थ टळला होता. सीसीटीव्हीमध्ये ही गोष्ट स्पष्ट दिसत असतानाही, पोलिसांनी पिस्तुलाचा वापर रेकॉर्डवर घेतला नव्हता, असे सूत्रांनी सांगितले.
बेकायदा धंद्यांना पाठबळ?
स्वारगेट आणि मार्केट यार्ड परिसरात गेल्या काही महिन्यांत बेकायदा धंद्यांचे प्रमाण वाढल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. मटका, जुगार, अवैध दारू आणि इतर बेकायदा व्यवसाय पुन्हा फोफावत असल्याचे सांगितले जाते. या धंद्यांमुळेच गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे. विशेष म्हणजे काही पोलिस अंमलदारांचा या धंद्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचीही चर्चा सूत्रांकडून होत आहे. त्यामुळेच गुन्हेगारांचे मनोबल वाढत असून, टोळीयुद्धासारख्या घटना घडत असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
