मुंबई-पुणेदरम्यान तिसरा द्रुतगती मार्ग, लोणावळा-खोपोली नवा रस्ता; बोगदे, उड्डाणपुलांचा समावेश

मुंबई-पुणेदरम्यान प्रस्तावित असलेल्या तिसऱ्या महामार्गाचे अर्थात, नवीन ‘द्रुतगती मार्गा’ची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या महिन्याभरात त्याचे भूमिपूजन होऊन कामही सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात पागोटे (अटल सेतू) ते चौकपर्यंतच्या (कर्जत) टप्प्याचे काम केले जाणार आहे. या नवीन ‘द्रुतगती मार्गा’ची पूर्णपणे नव्याने आखणी केली जाणार आहे.

कसा असेल मार्ग?

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी ‘मुंबई-बेंगळुरू एक्स्प्रेस वे’ची घोषणा केली होती. मुंबई-पुणेदरम्यानची वाढलेली वर्दळ आणि सध्याच्या ‘द्रुतगती मार्गा’वर होणारी कोंडी विचारात घेऊन, नवीन बेंगळुरू द्रुतगती रस्त्याचा एक भाग असलेला मुंबई-पुणेदरम्यानच्या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पावले उचलण्यात आली होती. त्यातूनच पागोटे ते चौक या टप्प्याचे काम हाती घेतले जाणार आहे

चौक (कर्जत) ते शिवरे (खेड-शिवापूर) या अंतरासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला मान्यता मिळाली आहे. त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे; तसेच येथील भूसंपादनाचा विषयही बहुतांशी मार्गी लागला आहे. दरम्यान, सध्या हा रस्ता आठपदरी केला जाणार आहे. मात्र, भविष्यात सोळा मार्गिकांपर्यंत विस्तार करण्याची क्षमता ठेवण्यासाठी १०० मीटर जागा संपादित केली जाणार आहे.

घाटात नवीन रस्ते, बोगदे अन् उड्डाणपूल

नवीन ‘द्रुतगती मार्गा’साठी लोणावळा ते खोपोली यादरम्यान पूर्णपणे नवीनच रस्ता केला जाणार आहे. यामध्ये बोगदे आणि उड्डाणपूल याचा समावेश असेल. मिसिंग लिंक आणि जुन्या महामार्गाबरोबरच घाट क्षेत्रात हा तिसरा नवीन रस्ता उपलब्ध होणार आहे.

लोणावळ्याहून खेड शिवापूर व्हाया पवना खोरे

‘नवीन द्रुतगती मार्ग लोणावळ्याहून पवना खोऱ्यातून मुळशीमार्गे खेड-शिवापूर येथील शिवरे गावात रिंग रोडला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूरकडे जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा रस्ता अधिक उपयुक्त ठरू शकतो. या मार्गाचा डीपीआर तयार करण्यात येत आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.

जुन्या महामार्गासाठी ‘डीपीआर’

पुणे-मुंबई जुन्या महामार्गासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला असून, मान्यतेसाठी तो केंद्रीय मंत्रालयाकडे पाठवण्याची सूचना नितीन गडकरी यांनी केली आहे. या रस्त्यावर २०३०पर्यंत ‘आयआरबी’कडून टोल वसुली केली जाणार आहे. त्यामुळे या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम ‘एमएसआरडीसी’कडून करायचे की महामार्ग प्राधिकरण करणार, याबाबत कालांतराने निर्णय घेऊ, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *