शिवज्योत घेऊन धावणाऱ्या तरुणांना भरधाव कारची धडक, पुण्यातील दोन शिवभक्तांचा जागीच करुण अंत

शिवजयंतीचा उत्साह, हातात शिवज्योत आणि छत्रपतींच्या नावाचा जयघोष करत गावाकडे धावणाऱ्या दोन तरुणांवर काळाने घाला घातला. मावळ तालुक्यात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन शिवभक्तांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. दोघेही मावळ तालुक्यातील शिंदेवाडी गावचे रहिवासी होते. काल गुरुवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला आहे.

नेमका कसा झाला अपघात?

शिवजयंतीच्या निमित्ताने गावात शिवज्योत आणण्याची परंपरा असल्यामुळे हे दोघे आणि त्यांचे काही मित्र विसापूर किल्ल्यावर गेले होते. तेथून शिवज्योत घेऊन हे तरुण आपल्या गावाच्या दिशेने धावत निघाले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव परिसरात दुर्दैवी घटना घडली. ओंकार आणि दर्शन हे रस्त्याच्या कडेला शिवज्योत घेऊन धावत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव कारने अचानक दुभाजक ओलांडला आणि दोघांनाही जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघे तरुण दूर फेकले गेले. आसपासच्या लोकांनी तातडीने धाव घेतली, मात्र तोपर्यंत दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
शिवजयंतीच्या दिवशीच दोन तरुण शिवभक्तांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शिंदेवाडी आणि मावळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कार चालकाविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *