महाराष्ट्र देशातलं प्रगत राज्य असलं तरी महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्यांच्या दृष्टचक्रात सापडलाय. शेतक-याच्या डोक्यावरील कर्जाचं ओझं उतरवण्याचा निर्धार सरकारनं केलाय. शेतकरी कर्जमाफीचा आर्थिक भार पेलता यावा यासाठी सरकारी पातळीवर अभ्यास सुरु आहे. 30 जून पूर्वीच शेतक-यांना कर्जमाफी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी सरकारला शेतकरी कर्जमाफीची आठवण करुन देण्यासाठी विदर्भात यात्रा काढली आहे.
ठाम विश्वास कृषिमंत्री दत्तात्रेय भरणेंनी व्यक्त केला
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारही गंभीर असल्याचं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय. 30 जूनपूर्वी शेतक-यांना कर्जमाफी देणारच असा ठाम विश्वास कृषिमंत्री दत्तात्रेय भरणेंनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात शेतक-यांची संख्या प्रचंड मोठी आहे. कर्जमाफी देताना ती गरजू शेतक-यालाच मिळावी असा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. कर्जमाफी देताना सरकार निकषांची चाळणी लावणार असून फक्त या चाळणीत गरजवंत शेतकरी अडकू नये अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अहवाल आल्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा
विधान परिषदेत (कलम 260 अंतर्गत चर्चेला उत्तर देताना) भरणेंनी स्पष्ट केले की, 30 जून 2026 पूर्वी शेतकरी कर्जमाफीचा अंतिम निर्णय जाहीर होईल. प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर होण्याची शक्यता आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर कॅबिनेट चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सहमतीने आणि घोषणेनुसार निर्णय होईल.
पोर्टलवर 74 हजार शेतकऱ्यांची माहिती
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. गेल्या वर्षी आणि नुकत्याच अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बँका आणि सहकारी संस्थांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात येत आहे. आतापर्यंत 74 हजार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपडेट झाली आहे, असंही कृषीमंत्र्यांनी सांगितलं.
कृषीमंत्री स्वत: शेतकऱ्याच्या घरातले
दत्तात्रय भरणे हे इंदापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. जुलै 2025 मध्ये मंत्रिमंडळ पुनर्रचनेत त्यांना कृषिमंत्रीपद मिळाले आहे. त्यांना ही जबाबादरी आपल्या वादग्रस्त भूमिकांमुळे अडचणीत आलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून स्वीकारावी लागली. भारणे स्वत:. शेतकरी पुत्र असल्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. अनेकदा भारणेंचं हे कृषी कनेक्शन उघडपणे बोलून दाखवलं जात.
