शिवमंदिराशेजारी खड्डा खणला, लिंबू-नारळ अन् अघोरी पूजा; गुप्तधनासाठी मांत्रिकासह 7 जणांना रंगेहाथ पडकलं

जमिनीखाली दडलेले गुप्तधन मांत्रिक शोधून देतात ही अंधश्रद्धा अजूनही अनेकांच्या मनात कायम आहे. मी पायाळू असून गुप्तधन दिसत असल्याचा दावा करून भोंदू मांत्रिक अनेकांना गंडा घालतात. असाच काहीसा प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आलाय. नायगाव तालुक्यातील गडगा जवळ महादेवाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या आवरात काहीजण गुप्तधनासाठी खड्डे खोदून अघोरी पूजा करत असल्याची माहिती नायगाव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकत मांत्रिक आणि त्याच्यासह सात साथीदाराना अटक केली. तेलंगनातील मांत्रिकाने नायगावमधील काही जणांना गुप्तधनाचे अमिष दाखवून या ठिकाणी आणले होते. पोलिसांना या ठिकानी फावडे, पूजेचे साहित्य मिळाले. या सात जणांवर पोलिसांनी जादूटोनाविरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

हा प्रकार म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा!

कोणत्याही जमिनीखाली मंत्रतंत्राने धन प्रकटत नाही. हा प्रकार म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेतून नरबळी देण्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. मांत्रीकांना जर गुप्तधन दिसले असले तर या मांत्रीकांना सोन्याच्या खाणीच्या ठिकाणी बोलावले नसते का अशी प्रतिक्रिया अनिसने दिली.

गुप्तधन शोधून देतो म्हणून भोंदू मांत्रिक अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. त्यातून लोकांची आर्थिक फसवणूक होते. याच भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेला आळा बसावा यासाठी कायदा करण्यासाठी नरेंद्र दाभोळकर यांनी आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या लढ्यामुळे जादूटोना विरोधी कायदा अस्तित्वात आला. पण तरीही ए आय क्रांतीच्या या युगातही अंधश्रद्धा कायम आहे. त्यामुळे याबाबत सरकारने नेहमी जनजागृती करणे गरजेचे आहे.

माणूस मंगळावर स्वारी करण्याचे मनसुबे आखत असताना अजूनही गुप्तधनाचे हंडे शोधणारे महाभाग समाजात आहेत. विज्ञानयुगातही अंधश्रद्धांवर बुवाबाजीवर विश्वास ठेऊन स्वतःचं आणि समाजाचं नुकसान करणा-यांवर कठोर कारवाईची मागणी होतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *