बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी धक्कादायक खुलासे! सोनोग्राफीसाठी आलेल्या महिलांच्या 30 सेकंदांच्या व्हिडिओने खळबळ

बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.  उल्हासनगर मधील एका सोनोग्राफी सेंटर मधून एका महिलेला अटक करण्यात आली होती. ती कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नसताना देखील सोनोग्राफी सेंटरची मशीन हाताळत होती. या महिलेने सोनोग्राफीसाठी आलेल्या महिलांचे 30 सेकंदांचे व्हिडिओ बनवून टोळीला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

स्त्री बीज प्रकरणात आत्तापर्यंत 7 आरोपींना अटक

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव सोनल गरेवाल असे आहे. या प्रकरणामुळे संबंधित सोनोग्राफी सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला असून, सेंटर सील करण्यात आले आहे.  उल्हासनगर आरोग्य अधिकाऱ्यांनी या सोनोग्राफी सेंटरमध्ये पाहाणी केले असता हा धक्कादायक खुलासा समोर आला. या प्रकरणात आत्तापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचे मुख्य केंद्र ठाणे 

स्त्री बीज तस्करीच्या प्रकरणाला बदलापूरपासून सुरूवात झाली नंतर, पोलिसांकडून जसजसा तपास केला गेला तसतसे या प्रकरणाबाबत अनेक खुलासे होत गेले. तपासादरम्यान या प्रकरणाचे मुख्य केंद्र ठाणे असल्याचे समोर आले. ठाण्यात महिलांचे अवैध स्त्रीबीजकरण सुरू होते. हा प्रकार ठाण्यातील आलिशान इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राजरोसपणे सुरू होता. गरजू महिलांना पैशांचं अमिष दाखवून ही तस्करी केली जायची. दरम्यान पुढील तपासात या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचल्याचे समोर आले. ज्यामध्ये नाशिकमधील एका डॉक्टरला अटक झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या स्त्री बीज तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त केला गेला. सरोगेट मदर म्हणून काम करणाऱ्या महिलाच एजंट बनून गरीब महिलांना जाळ्यात ओढत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.

बदलापूर, नाशिकसह आणखी 7 राज्यातही तस्करी 

आयुष्यात एकदाच एक महिलेला बीज देता येतात मात्र दहा पेक्षा अधिक वेळेस बीज दिल्याचे समोर आले. यासाठी काही महिलांची बेकायदेशीर सोनोग्राफी करण्यात येत असे. यासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा पुरवठा कंपनीचा प्रतिनिधी थेट करत असे ,एका एजंटकडे शेकडो इंजेक्शनचा साठा आढळून आला. या संपूर्ण प्रक्रियेत वैद्यकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचेही आरोप आहेत. रॅकेटमधून स्त्री बीज परदेशात पाठवले जात असल्याने आंतरराष्ट्रीय तस्करी तर नाही ना अशी शंका पोलिसांकडून व्यक्त केली जात होती. आतापर्यंत अटक करण्यात आलेला डॉ अमोल पाटील हा पहिला डॉक्टर असून त्याशिवाय बदलापूर मधून एजंट सुलक्षणा गाडेकर, अशिवनी चाबूकस्वार, मंज्यूषा वानखेडेसह सोनोग्राफी चालक आणि एम आर सुमीत सोनकांबले यांना अटक करण्यात आली आहे. केवळ नाशिक ते बदलापूर हा प्रवास होत नव्हता तर एकूण सहा राज्यांमधून ही तस्करी होत असल्याचा समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *