आखातानं लावला भारतीयांच्या जीवाला घोर; जेवणाच्या ताटातून गायब होणार डाळी, तेल? पैशाचं काय?

स्रायल इराण युद्धाचे थेट परिणाम आता जवळपास संपूर्ण जगावर दिसण्यास सुरुवात झाली आहे. भारतावर हे परिणाम आणि त्यांची झळ सामान्यांवरच अधिक परिणाम करत असल्याची वस्तूस्थिती आहे. कारण, या युद्धजन्य परिस्थितीमुळं भाववाढीचा आगडोंब उसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सामान्यांच्या दैनंदिन आहारात असणाऱ्या डाळीसुद्धा महागण्याची शक्यता असून, खाद्यतेलाचे भाव आतापासूनच वाढायला सुरुवात झाल्यानं या संकटाची जाणीव होण्यास सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.

जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभं

सध्या जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभं असून, त्याचे पडसाद थेट स्वयंपाकघरापासून ते शेअर बाजारापर्यंत उमटत आहेत.  महागाईचा बॉम्ब फुटण्याच्या भीतीने सामान्य माणूस हादरला आहे. शेअर बाजार कोलमडतोय, तर धान्य बाजारात आतापासूनच दर गगनाला भिडण्यास सुरुवात झालीय.

नेमकं काय घडतंय? पाहा विशेष रिपोर्ट

युद्धाचं सावट जगभरात पसरलं आणि बाजारपेठाही त्यातून सुटल्या नाहीत. धान्य बाजार असो की सोन्याचा बाजार सगळीकडेच युद्धाचे पडसाद पाहायला मिळाले, युद्धामुळे आयात-निर्यात विस्कळीत झाली आणि त्यातच स्वयंपाकाच्या तेलापासून ते डाळींपर्यंतच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यामुळेच सामान्य गृहिणींचं बजेट कोलमडलं. अनेक ठिकाणी लोकांनी महिनाभराचा साठा आताच करून ठेवण्यासाठी गर्दी केली. व्यापारीसुद्धा चिंता असल्याचं कबूल करत असले तरीही लोकांनी घाबरू नये, संयम बाळगावा बाजार पेठ इतक्या लवकर अस्थिर होणार नाहीत असं व्यापारी संघटना सांगत आहेत. मुळात ग्राहकांच्या मनातली भीती हाच व्यापाऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. तुटवडा निर्माण होईल या भीतीनं बाजारात खरेदीचं प्रमाण वाढल्यास खाद्यतेल आणि डाळींचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. पण लोकांनी घाबरुन जाऊ नये असं व्यापारी सांगतात.

भारत खाद्यतेल, डाळी मोठ्या प्रमाणात आयात करतो. ही सगळी आयात समुद्रमार्गे होत असते. सध्या हार्मुजच्या सामुद्रधुनीत तणाव असल्यानं त्याचा खाद्यतेल आणि डाळींच्या आयातीवर परिणाम होण्याची भीती आहे. नुसत्या युद्धाच्या भीतीनंच सध्या तेलाचे भाव वाढल्याची माहिती समोर आलीय. खुल्या बाजारात सगळ्या प्रकारच्या खाद्यतेलाच्या भावांमध्ये प्रतिलीटर दहा ते वीस रुपयांची वाढ झालीये. भारत खाद्यतेल आयात करताना इंडोनेशिया, रशिया या देशांकडून आयात करतो. खाद्यतेलाच्या आयातीत संभाव्य तूट निर्माण होण्याची शक्यता गृहित धरुन तेलाचे भाव वाढल्याचं सांगण्यात येतंय. किचनमधील काही जिन्नसांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

  •  हरभरा
  •  मूग
  • मटकी
  •  तूर
  •  उडीद
  • वाटाणा
  • मसूर
  • चवळी
  • खाद्यतेल
  • सोयाबीन

रुपयाची पडझड आणि शेअर बाजाराची चिंता 

युद्धासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची वाढलेली किंमत हासुद्धा चिंतेचा विषय आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यानं भारतीयांसाठी आयात केलेल्या जीवनावश्यक वस्तू आणखी महागतात. शेअर बाजारातही पुरता गोंधळ उडाला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने बाजार कोसळलाय. सामान्य गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. शेअर्स विकून बाहेर पडावं की ”होल्ड” करावं? उलाढाल थांबली नसली, तरी भीतीचा पारा मात्र चढलेलाच असताना तज्ज्ञ मात्र ‘घाबरू नका, सावध राहा अफवांवर विश्वास ठेवू नका’ असा सल्ला देत आहेत.

युद्ध अभ्यासकांच्या माहितीनुसार दोन आठवाड्यापेंक्षा जास्त युद्ध चाललं याचा परिणाम दिसू शकतो मात्र, लोकांनी घाबरू नये असं सांगत काही दिवसात संपलं तर परिणाम दिसणार नाहीत, त्यामुळं युद्धाचा कालावधी भारतासाठीसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे हे खरं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *