गिरणारे पंचक्रोशीतील गंमतजंमत हॉटेल परिसरात पाच तरुण प्रवास करीत असलेल्या अल्टो कारचालकाचा ताबा सुटल्याने जीवघेणा अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झालेला सातपूरमधील अशोकनगर भागातील जाधव संकुल येथील सार्थक भगवान रहाणे (वय २४) याचा मृत्यू झाला.
गिरणारे पंचक्रोशीतील रस्त्यावर अल्टो कारच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार उलटून सार्थक गंभीर जखमी झाला. इतरांनाही दुखापत झाली. सार्थक याचा चुलतभाऊ हरीश याने त्याला तत्काळ जिल्हा रुग्णाला दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सार्थकला तपासून मृत घोषित केले. घरातील एकुलत्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्याचे हवालदार आर. के. पगारे, शिपाई अमोल गांगुर्डे तपास करत आहेत.
पतीनंतर मुलाचाही वियोग
अशोकनगर येथील जाधव संकुल परिसरातील होळकर चौक येथे रहाणे दाम्पत्याचा संसार सुखाने सुरू होता. परंतु, करोना काळात सार्थकचे वडील भगवान रहाणे यांचा मृत्यू झाला. आता संदीप फाउंडेशन येथे फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या सार्थकचादेखील अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. सार्थक चार तरुणांसोबत अल्टो गाडीतून प्रवास करीत होता. यामध्ये गौरव घोटेकर आणि दीपक गुंजाळ यांच्यासह सिडकोतील दोन तरुण जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.
