जावयाला पकडून आणून गाढवावर बसवलं; 5 तास DJ च्या तालावर नाचत गावभर फिरवलं

विविध मागण्या घेऊन अट्टहास करणे जावई आपल्याला अनेक पहावयास मिळतात. सासरच्या मंडळीकडूंन तशी त्यांचे हट्टही पुरविण्यात येतो. मात्र बीड जिल्ह्यातील विडा या गावात जावयाला रंगपंचमीच्या दिवशी चक्क गाढवावर बसून त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. विडाकरांची ही अनोखी परंपरा गेल्या 90 वर्षांपासून सुरु आहे. जाणून घेऊयात याच प्रथेबद्दल…

कोणी सुरु केली ही प्रथा?

संपूर्ण देशासह बीड जिल्ह्यातही धुलिवंदन मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आले. परंतु विडा या गावात जरा हटके धुलिवंदन साजरे झाले. ते म्हणजे गावच्या जावयाला चक्क गाढवावर बसवून मिरवणूक काढण्यात आली. एरवी आपला मिजाज दाखविणारा जावई मात्र धुलिवंदनाच्या दिवशी हत्ती घोड्यावर नाही तर चक्क गाढवावर बसलेला दिसून आला. ही अनोखी परंपरा जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी सुरु केल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावातील स्थानिक असलेल्या विनोद ढोबळेंनी या प्रथेची माहिती दिली.

शोधून शोधून आणले जातात जावई

साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या या विडा गावात 150 घरजावई कायम स्वरुपी वास्तव्यास आहेत. धुलिवंदनाच्या दोन दिवस आगोदार जावई शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी गावात पथकही नेमले जाते. धुलिवंदनाच्या दिवशी त्या जावयाला पकडून गाढवावर बसविण्याची तयारी करण्यात येते. यंदा मात्र अनेक तरूण जावई पोबारा केल्यानंर जाधव जवळा गावातील रहिवासी असलेले जावई शिवाजी गालफाडे यांना गाठण्यात आलं अन् त्यांची गाढवावर बसण्याकरीता वर्णी लागली. डीजेच्या तालावर गावातील तरुणांनी नाचत या जावयाची मिरवणूक काढली.

पाच तास चालली मिरवणूक

सकाळपासूनच संपूर्ण गावातून वाजत गाजात जावयाची मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गाव या मिरवणुकीत सहभाग घेते. तब्बल पाच तास मिरवणूक चालल्यानंतर मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवीन कपड्याचा आहेर चढविण्यात आला. विशेष म्हणजे गाढवावर बसविण्यात आलेल्या जावयाला दुसऱ्यांदा बसविण्यात येत नाही. जावई मोठ्या उत्साहात गाढावावर बसतो हे विशेषच.

देशातील एकमेव असं गाव

सासरच्या मंडळीकडून आपेक्षा करीत रुसवा फुगवा करीत आपला एट दाखविणारा जावई मात्र विडा गावात निपचितपणे गाढवावर बसून गावकऱ्यांसह स्वत:ही धुलिवंदनाचा मनसोक्त आनंद घेताना दिसतोय. थट्टेतून जावयाचा सन्मान करणारे विडा हे गाव राज्यातच नाही तर संपूर्ण देशातले पहिलेच आहे, असं हा सोहळा पाहिल्यावर म्हणता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *