मुंबई-दुबई फ्लाईटला हवेतच धडकली असती Missile? पायलेटनं Double Reverse घेतल्यानं वाचले

अमेरिका, इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनतर आखाती देशांमध्ये सुरु झालेल्या संघर्षामुळे या भागातील विमान वाहतूक सेवा थांबवण्यात आली आहे. त्यामुळेच हजारो प्रवाशी विमानतळांवर अडकून पडले आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांवर हवाई हल्ले केले जात असल्याने क्षेपणास्रांचा धोका लक्षात घेत अनेक विमान कंपन्यांनी आखाती देशांमधील सेवा तात्पुरत्या रद्द केल्या आहेत. मात्र हे सारं सुरु असतानाच दुबईच्या एअरस्पेसमध्ये आकाशात हजारो फुटांवर एका थरारक घटनाक्रम घडल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं घडलं काय?

संरक्षण मंत्रालयाने हवाई संरक्षण दलांना इराणकडून प्रक्षेपित केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा सामना करावा लागत असल्याचे सूचित केल्यानंतर मंगळवारी सकाळी एमिरेट्सच्या दुबईला जाणाऱ्या विमानाच्या वैमानिकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. एमिरेट्सच्या ईके501 विमानाला क्षेपणास्रांसंदर्भातील इशारा मिळाल्यानंतर वैमानिकाने विमान यूएईच्या हवाई हद्दीबाहेर रोखलं. मात्र हे करण्यासाठी या वैमानिकाला फारच क्वचित वापरल्या जाणाऱ्या ‘डबल रिव्हर्स’ पद्धतीचा वापर करावा लागला.

‘डबल रिव्हर्स’ का घेण्यात आला?

महाराष्ट्रातील मुंबईहून उड्डाण घेतलेल्या एमिरेट्सच्या विमानाने यूएईच्या हवाई हद्देत जाण्याऐवजी ‘डबल रिव्हर्स’ घेतला. अशाप्रकारे ‘डबल रिव्हर्स’चा वापर करणं हवाई क्षेत्रामध्ये फार दुर्मिळ मानलं जातं. युएईवर इराणकडून हल्ले होत असल्याचं लक्षात आल्यानंतर विमान उतरवता येणार नसल्यासारखं वाटल्याने वैमानिकाने पुन्हा मुंबईच्या दिशेने विमान वळवलं. मात्र नंतर इराणकडून सुरू असलेल्या हल्यांमुळे अधिकाऱ्यांकडून होल्डचा इशारा मिळण्याआधी विमान पुन्हा दुबईच्या दिशेला जात होतं. पण पुढे न जाण्याच्या सूचना मिळाल्याने विमान पुन्हा मुंबईकडे वळल्याचं आणि परत वळून दुबईकडेच गेल्याचं ‘फ्लाइटरडार24’ने म्हटलं आहे. वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हे विमान थोडक्यात बचावल्याची सध्या चर्चा आहे. ‘डबल रिव्हर्स’ पद्धतीमध्ये अगदी कमी कालावधी आणि अंतरावर हवेतच फेऱ्या मारल्या जातात. आपत्कालीन स्थितीमध्ये विमान नेमकं कुठे उतरवायचं हे निश्चित ठरत नाही तेव्हा असा प्रकार घडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *