मद्य, काठी आणि मोकळे हास्य, बंजारा महिलांनी साजरी केली पारंपरिक होळी

होळीच्या दिवसी सर्व हेवे, दावे, राग, लोभ विसरून एक माणूस दुसऱ्या माणसाला भेटतो. सारी दु:खे विसरून होळीच्या रंगात रंगून जातो. असाच आयुष्यभर कष्टात राबून जीवन जगणारा बंजारा समाज आज देशभर विखुरला आहे. जीवन जगण्यासाठी फारशी व्यावसायिक साधने उपलब्ध नसणारा हा समाज भटक्या स्थितीतून हळुहळू स्थिरावत चाललेला, आजही पोटासाठी झगडतांना दिसतो. कष्टावर असलेलं पोट घेऊन आजही वर्षातील सहा महिने निर्वासित अवस्थेत दिवस काढतो. पण त्यांनी आपली संस्कृती कधीच विसरली नाही.

या समाजाने आजही तंत्रज्ञान युगात आपली संस्कृती, चालीरीती, रुढी, परंपरा जपलेली आहे. होळी म्हणजे बंजारा समाजाचा जीव की प्राण. गोरबंजारा हा होळीला जिथे असो, जसा असो त्या अवस्थेतही आपली होळी साजरी करीत आलाय. यातच त्याची आयुष्याकडे बघण्याची डोळस दृष्टी व त्यांना जीवनाचं मर्म कळलेलं असावं म्हणून तो दुःखातही सुखी जीवन जगत असतो.

अशा बंजारा लोकांना सारं विसरून रंगात रंगवून नाचायला, गायला, लावणारी ही त्यांची होळी. बंजारा संस्कृतीप्रमाणेच त्यांची होळीसुद्धा वेगळ्या स्वरूपाची आहे. बंजारा समाजाची होळी म्हणजे अवघ्या जगातला आगळा वेगळा रंगोत्सव, नृत्योत्सव, गीतोत्सवच म्हणावा लागेल

माघ अमावस्या ओलांडली की, डोंगर पठारांवर दूर रानोमाळी वसलेल्या लमाण तांड्यावर डफ-नंगाऱ्याचे पडघम वाजू लागतात. रात्रीच्या उत्तर प्रहरापर्यंत लेंगी गीतांचे सूर रात्रीच्या नीरव शांततेत आसमंतात घुमू लागतात. दूरवरून डोंगरातून कानी पडणारी गीते प्रत्येकाला सुखावून जातात. फाल्गुनी पौर्णिमा अर्थात ‘फागण’ येईपर्यंत जसजसा चंद्र फुलत जातो, तसतसा लमाणांच्या लेंगी गीतांना बहर येऊ लागतो.

या गीतांची शृंगारपूर्ण नशा अवघ्या परिसरातल्या पर्यावरणाला मदहोश करून आपल्या पायी, डोडपायी, फेरी, मोड, ठणको, घुमर, डंडा, गिरकी आदी नाच ठेक्यावर झुलायला नाही लावले तर ती लेंगीच कसली.

मद्यप्राशनाची प्रथा

होळी हा सण बंजारा समाजात महिलांसाठी विशेषतः महत्त्वाचा आणि आनंदमय असतो. कारण या दिवशी त्या रोजच्या धगधगत्या, कष्टमय जीवनातून स्वतःसाठी जिवंत होऊन जगतात. होळीमध्ये ग्रामीण भाग असो वा शहरी भाग, बंजारा महिलांना मद्यप्राशन करण्याची मुभा असते. या दिवशी पती स्वतः तिची काळजी घेतो आणि सांभाळतो. घरातील इतर सदस्यही याबाबत कोणतीही बंदी किंवा टीका करत नाहीत.

होळीच्या उत्सवात महिलांना कोणाचीही रोकटोक सहन करावी लागत नाही, त्या पूर्ण स्वातंत्र्याने आणि मोकळेपणाने आनंद घेतात. तसेच, आणखी एक खास आणि मजेदार परंपरा आहे ती म्हणजे हातात काठी घेऊन मारणे होळीच्या खेळात नणंद-भावजई आणि देवर यांना काठीने खेळकर पद्धतीने मारण्याची प्रथा जपली जाते. ही परंपरा मौजमजेसाठी आणि एकमेकांशी जवळीक वाढवण्यासाठी असते.

या सगळ्यामुळे बंजारा समाजातील होळी महिलांसाठी मुक्तीचा, आनंदाचा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा खरा उत्सव ठरतो

धुंड संस्कार म्हणजे बंजारा होळीचा आत्मा

लमाण बंजारांसाठी होळीतला धुंड संस्कारविधी हा त्यांच्यासाठी पवित्र आणि अनेकार्थाने महत्त्वपूर्ण मानला जातो.  ‘धुंड’चा सरळ अर्थ ‘शोधणे’ असा होतो, पण हा संस्कार आणि या संस्काराचा विधी होतो, ‘धुंड गीत’ गायले जाते तेव्हा. या ‘धुंड’चा अर्थ इतका सरळ व वरवरचा निश्चितच असणार नाही. धुंड संस्कार गीताचा अर्थ पाहिला तर मानवी जगण्याच्या सर्वच रीतीभातींना ते कवेत घेते.

मानवी उत्पत्तीपासून विकासापर्यंतच्या अवस्थांचा पुनरावलोकन म्हणता येईल, एवढी प्रक्रिया अवस्थांतरण या धुंड गीताच्या संस्कारामध्ये दडलेली दिसते. यात बीजारोपणापासून त्याची वंशवेल वाढवण्यापर्यंतचे चित्र दृश्य पावते. तथा या विलक्षण स्वरूपाचा जीवनार्थ लपलेला आहे.

लमाणगणांच्या जगण्याचे तत्त्वज्ञान, आचारधर्म, जीवनविषयक धारणा यांचा खऱ्या अर्थाने इथे शोध सुरू आहे. नाहीतरी प्रत्येक जण आपापल्या परीने जगण्याचा अर्थ लावत असतो, शोधत असतो. होळीला दरवर्षी देशातल्या हर एक लमाण तांड्यांवर धुंड संस्काराचा नेम ठरलेला असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *