मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी यलो अलर्ट, तापमानाने गाठला उच्चांक

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात तापमानाचे प्रमाण वाढत आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, 4 आणि 5 मार्च रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड परिसरात उष्णता आणि आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार होत असून मार्च महिन्यासह यंदाचा उन्हाळाही अधिक तीव्र असेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूपानुसार यंदाच्या उन्हाळ्यात मध्य भारतासह राज्यातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात उष्णतेच्या लाटांचीही शक्यता आहे. मार्च महिन्यापर्यंत 37 अंशापर्यंत पारा असेल असे हवामान खात्याने म्हटले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तास मुंबईसह आणि परिसरासाठी महत्त्वाचे असणार आहेत. मुंबईतील तापमान हे कमाल 36 अंशाचे तर किमान 22 अंशाचे असतील.IMD मुंबईच्या सुष्मा नायर यांनी सांगितले की, मार्च महिन्यापासूनच उष्णतेची चाहुल लागायला सुरुवात होतील. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान सर्वाधिक असेल.

यावर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच राज्यात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मागील आठवड्यात विदर्भासह काही भागांमध्ये पावसाची नोंद झाली होती. यामुळे राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होत असून यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कोकण पट्ट्यात तुलनेने मध्यम ते उष्ण स्वरूपाचे तापमान राहण्याची शक्यता असून मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच काही हवामान अभ्यासकांनी पुढील काही महिन्यात ‘एल निनो’ विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

प्रमुख शहरांचे आजचे तापमान 

अकोला: 38°C पर्यंत (राज्यातील सर्वाधिक तापमान येथे नोंदवले गेले आहे)
मुंबई: 29°C ते 33°C (आकाश ढगाळ राहण्याची शक्यता)
पुणे: 26°C (स्वच्छ आकाश)
नागपूर: 27°C (धुके/धुरकट वातावरण)
सोलापूर: 31°C (स्वच्छ आकाश)
नाशिक: 24°C (स्वच्छ आणि आल्हाददायक)

हवामानाचे महत्त्वाचे अपडेट्स

उन्हाचा तडाखा: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भ आणि कोकण भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.
पुढील अंदाज: पुढील काही दिवसांत कमाल तापमान 37°C ते 38°C पर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
इशारा: दुपारच्या वेळी कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे आणि पुरेसे पाणी प्यावे असा सल्ला देण्यात आला आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40°C च्या दिशेने सरकत असल्याने तेथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तुम्ही हवामान खात्याच्या (IMD) अधिकृत वेबसाईटवर अधिक सविस्तर माहिती पाहू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *