जोडप्याकडून 33 लहान मुलांवर लैगिंक अत्याचार, कोर्टाची शिक्षा ऐकून उडाला थरकाप!

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील विशेष पोक्सो कोर्टाने एका जोडप्याला कठोर शिक्षा सुनावली आहे. सिंचन विभागात ज्युनियर इंजिनियर असलेला रामभवन आणि त्याची पत्नी दुर्गावती यांनी मिळून 33 लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केला. पोर्नोग्राफी तयार करुन डार्क वेबवर विकल्याचा आरोप आहे. कोर्टाने हा गुन्हा ‘दुर्मिळात दुर्मिळ’ म्हणजेच रेअरेस्ट ऑफ रेअर असल्याचे सांगितले आणि दोघांनाही कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले. कसा घडला प्रकार? यावर कोर्टाने काय म्हटलंय? सविस्तर जाणून घेऊया.

काय नेमकं प्रकरण?

रामभवन चित्रकूट येथे काम करत होता. त्याने आणि त्याची पत्नी दुर्गावतीने 2010 ते 2020 या 10 वर्षांत बांदा आणि चित्रकूट भागात हे भयानक कृत्य केले. आरोपीकडून मुलांना ऑनलाइन व्हिडिओ गेम्स खेळायला देणे, पैसे देणे, खेळणी आणि भेटवस्तू देऊन आमिष दिले जात होते. नंतर त्यांचे लैंगिक शोषण केले. काही मुलांचे वय फक्त 3 वर्षे होते. शोषण करताना काही मुलांच्या खासगी अवयवांना गंभीर जखमा झाल्या. अनेक मुलं आजही हॉस्पिटलमध्ये आहेत आणि मानसिक त्रास सहन करत आहेत. सीबीआयला इंटरपोलकडून ही माहिती मिळाली. यानंतर 30 ऑक्टोबर 2020 रोजी रामभवनविरुद्ध केस दाखल करण्यात आली.

तपासात काय काय आढळलं?

तपासात एक पेन ड्राईव्ह सापडला ज्यात 679 फोटो आणि व्हिडिओ होते. यात 36 मुलांचा लैंगिक छळ दाखवला होता. हे सगळे मटेरियल डार्क वेबवर विकले जात होते आणि सुमारे 40 ते 45 देशांत विक्री झाली होती. आरोपींनी मुलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ बनवून परदेशात पैसे कमावले. तपासात फॉरेन्सिक तज्ज्ञ, डॉक्टर आणि बाल संरक्षण अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यात आला.

4 वर्षे चालला खटला

यानंतर 10 फेब्रुवारी2021 रोजी दोघांविरुद्ध चार्जशीट दाखल झाली. खटला तब्बल 4 वर्षे चालला. 74 साक्षीदारांची चौकशी झाली. विशेष न्यायाधीश प्रदीप कुमार मिश्रा यांनी 160 पानांच्या निकालात सविस्तर माहिती दिली आणि 21 फेब्रुवारी 2026 रोजी हा निकाल जाहीर झाला.

कोर्टाने काय दिली शिक्षा 

कोर्टाने सरकारला प्रत्येक पीडित मुलाला 10 लाख रुपयांचा मोबदला देण्याचे आदेश दिले. आरोपींच्या घरातून जप्त केलेली रोकड सर्व पीडितांमध्ये समान वाटून द्या, असेही सांगितले. रामभवन नारायणी गावचा रहिवासी आहे. दोघेही बांदा तुरुंगात आहेत. दुर्गावतीला नंतर हायकोर्टाने जामीन दिला होता. या निकालाने पूर्ण देशात खळबळ उडाली आहे. बालकांच्या सुरक्षिततेसाठी हे एक मोठे पाऊल असून अशा आरोपींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून आली आहे. पीडित मुलांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पण मुलांवर झालेला मानसिक आघात कधीही भरून निघणार नाही, अशी खंत व्यक्त करण्यात येतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *