प्लास्टिकच्या वस्तू टिकाऊ असतात मात्र, त्यात वापरले जाणारे प्लास्टिसक कमी दर्जाचे असेल तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते. हे लक्षात घेता, भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी कमी दर्जाची प्लास्टिकची खेळणी, फुगे आणि फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
कमी दर्जाच्या प्लास्टिकवर बंदी घालण्याची मागणी
दरम्यान प्लास्टिक बंदी बाब बोलताना आमदार विक्रम सिंह यांनी सांगितले की, लग्नसमारंभात व धार्मिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची विक्री होते. प्लास्टिकच्या वस्तू, फुले असे बरेच साहित्य सजावटीसाठी वापरले जाते. हे प्लास्टिक कमी दर्जाचे असेल तर, यामधून उन्हामुळे बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे डोकेदुखी, त्वचारोग तसेच श्वसनाचा त्रासही होऊ शकतो. तसेच लहान मुलांसाठी असलेली खेळणी देखील प्लास्टिकने तयार केलेली असतात. त्यातील घातक, विषारी रंगांमुळे लहान मुलांना कर्करोग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे लग्नसमारंभातील सजावटीच्या वस्तूंसाठी नॉन टॉक्सिक प्रमाणपत्र बंधनकारक करा. प्लास्टिक फुलांवर पूर्णपणे बंदी घाला. प्लास्टिक खेळण्यांवर निर्बंध आणा अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्लास्टिक बनवण्यासाठी कोणती रसायने वापरली जातात?
प्लास्टिक हे प्रामुख्याने पॉलिमरपासून तयार केले जाते. प्लास्टिकपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी अनेक रसायनांचा वापर केला जातो. बिस्फेनॉल-ए हे रसायन पाण्याच्या बाटल्या आणि डब्यांमध्ये वापरले जाते. थॅलेट्स हे रसायन प्लास्टिकला लवचिकता देण्यासाठी वापरले जाते. पॉलीविनाईन क्लोराईड या रसायनांचा वापर पाईप्स आणि काही खेळण्यांमध्येही केला जातो. तसेच पॉलिथिलीन पिशव्या आणि वेष्टनांसाठी वापरले जाते.
कमी दर्जाच्या प्लास्टिकचा लहान मुलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
बीपीए आणि थॅलेट्स सारखी रसायने शरीरातील हार्मोन्सची नक्कल करतात. यामुळे वाढत्या वयात शरीरात होणारे नैसर्गिक बदल योग्य काळाआधीच घडू शकतात. दुधाची बाटली किंवा खाण्याची प्लेट कमी दर्जाच्या प्लास्टिकने तयार केली असेल तर, ती तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. याप्रकारचे प्लास्टिक जेव्हा गरम होते तेव्हा त्यातील स्टायरीन आणि विनाईल क्लोराईड सारखी विषारी रसायने अन्नात मिसळतात. ही रसायने शरीरात गेल्यास भविष्यात रक्ताचा कर्करोग किंवा यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
कमी दर्जाचे प्लास्टिक कसे ओळखाल?
प्लास्टिकपासून बनलेल्या प्रत्येक वस्तूवर एक विशिष्ट क्रमांक दिलेला असतो. ज्यावरून प्लास्टिकचा दर्जा ठरवला जातो. यामध्ये 1 ते 7 क्रमांकाचा समावेश असतो. पाण्याच्या बाटल्यांवर 1 क्रमांक असतो. याचा अर्थ त्या एकदाच वापराव्यात पुन्हा वापरल्यास रसायने बाहेर पडतात. क्रमांक 2, 4, 5 असलेले प्लास्टिक दूध आणि अन्न साठवणीसाठी सुरक्षित मानले जाते. क्रमांक 3 असलेले पिव्हीसी प्लास्टिक अन्नासाठी कधीही वापरू नयेत. कारण त्यात विषारी रसायने असतात. बऱ्याचदा कार्यक्रमात जेवणासाठी थर्माकोलच्या प्लेट वापरल्या जातात. त्यात गरम पदार्थांचे सेवन केल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. अशा प्लेट्सवर क्रमांक 6 नोंदवलेला असतो. तसेच क्रमांक 7 असलेले प्लास्टिक मुलांच्या आरोग्यासाठी सर्वाधिक धोकादायक मानले जाते
