मराठी पुस्तक प्रेमींसाठी मेजवानी! शिवाजी पार्कमध्ये MNS कडून ‘अभिजात पुस्तक प्रदर्शन’

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाचनप्रेमींसाठी खास सांस्कृतिक मेजवानी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्या पुढाकारातून मुंबई येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे ‘अभिजात पुस्तक प्रदर्शन’ आणि ‘अभंग रिपोस्ट’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सांस्कृतिक उपक्रम रंगणार आहे. उद्घाटनासाठी सगळ्या मराठी वृत्तसंस्थांचे संपादकांना निमंत्रित करण्यात आले होते.

कधी पासून होणार सुरुवात?

26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात पुस्तक प्रदर्शनाचा शुभारंभ झाला असून विविध वर्तमानपत्रांतील ज्येष्ठ पत्रकार या वेळी उपस्थित होते.  त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता ‘अभंग रिपोस्ट’ हा अनोखा संगीतप्रयोग सादर केला जाणार आहे.

वेळ काय आहे?

या प्रदर्शनात तब्बल 92 प्रकाशक सहभागी झाले असून हजारो पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध असतील. कादंबऱ्या, वैचारिक साहित्य, पौराणिक कथा, ऐतिहासिक ग्रंथ अशा विविध प्रकारांतील समृद्ध साहित्यसंपदा येथे पाहता येणार आहे. 27 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान दररोज दुपारी 1 ते रात्री 9 या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.

‘अभंग रिपोस्ट’ खास कार्यक्रम 

‘अभंग रिपोस्ट’ हा तरुणाईला भावणारा फ्युजन बँड पारंपरिक संतवाङ्मयाला आधुनिक संगीताची जोड देत नव्या पद्धतीने सादर करतो. रॉक, सूफी, फोक आणि इंडी शैलींच्या मिश्रणातून अभंगांचे सादरीकरण करताना भक्तीभाव कायम राखला जातो. आधुनिक साउंड डिझाइन आणि ऊर्जा भरलेले लाईव्ह परफॉर्मन्स यामुळे प्रेक्षकांना वेगळाच अनुभव मिळणार आहे.

नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्या मते, या उपक्रमाचा मुख्य हेतू संतसाहित्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे. परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधत अभंगांना आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. फक्त गाणी सादर करण्यापुरते मर्यादित न राहता भक्तीपरंपरेला नवसंजीवनी देण्याचा ‘अभंग रिपोस्ट’चा प्रयत्न रसिकांना निश्चितच भावेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *