यवतमाळला अवकाळी फटका! गारपिटीमुळे गहू, हरभऱ्याचे मोठे नुकसान; भंडारा, वर्धा, नागपुरातही बरसल्या सरी

 विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. सोमवारी पहाटेच्या सुमारास बरसलेल्या या सरींमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाल्याने नुकसानीची तीव्रता वाढली आहे.

रविवारच्या रात्रीपासूनच वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले. सोमवारच्या मध्यरात्रीनंतर विजांचा कडकडाट व हलक्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्याने शेतात काढणीसाठी ठेवलेला हरभरा, तूर, मूग आदी कडधान्य, पिके भिजली. फळबागांनाही या पावसाचा फटका बसला असून, आंबा व इतर बागायती पिकांवरील मोहोर गळण्याची शक्यता आहे. नागपुरात मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दमदार पावसामुळे काही काळ वीजही गायब झाली होती. भंडाऱ्याही सरींचा जोर अधिक होता. सिरोंचात सोमवारी सायंकाळच्या सुमारास तुरळक सरी कोसळल्या.

यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. रविवारी रात्री व सोमवारच्या सकाळी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात गहू व हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राळेगाव, मारेगाव, कळंब, केळापूर, उमरखेड, महागाव आणि दिग्रस तालुक्यातील अनेक गावांना या पावसाचा फटका बसला. उमरखेड तालुक्यातील मुळावा, तिवरंग, झाडगाव, विडूळ; महागाव तालुक्यातील वाकान, कोनदरी, वनोली, चिंचपाड या गावांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक आहे. काही ठिकाणी गहू व हरभरा काढणीचे काम सुरू होते. राळेगाव तालुक्यातील काही गावांत गारपीट झाल्याने नुकसानीचा आकडा वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *