रायगड किल्ल्यावर असणारा रोपवे दुरुस्तीच्या कारणाकरता 23 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक राजधानी असणारा रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी अभिमानाचे प्रतिक. या रायगडावर गेल्यानंतर प्रत्येक मराठी मनाला वेगळीच ऊर्जा प्राप्त होते. किल्ले रायगडवर वृद्ध आणि अपंग व्यक्तींना देखील रायगड किल्ला पाहता यावा, यासाठी रायगड रोपवे उभारण्यात आला आहे. हाच रोप-वे रायगडावर येणाऱ्या पर्यटकांना अखंड सुविधा देतो. मात्र वार्षिक तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी 23 ते 28 फेब्रुवारी यादरम्यान दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असं रायगड रोपवेचे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकार स्पष्ट केलं आहे. दुरुस्ती व देखभालीसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरअसंख्य शिवभक्तांना व पर्यटकांना रोपवेच्या माध्यमातून रायगड किल्ल्याचे दर्शन वर्षभर होत असते. मात्र यात रोपवेची वार्षिक तांत्रिक देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने या कालावधीत रोपवेची सेवा पूर्णपणे बंद राहणार असून १ मार्च २०२६ पासून रोपवे सेवा पर्यटकांच्या सेवेसाठी सुरळीतपणे सुरू राहील, पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी रोपवे प्रशासनाकडून पर्यटकांच्या माहितीसाठी आगाऊ माहिती देण्यात आली आहे.
रायगड रोपवे बंद राहणार असल्याने पायरी मार्गाने जाणाऱ्या शिवभक्तांची व पर्यटकांची संख्या मात्र या काळात मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने मार्गाकडे जाणारा रस्ता या काळात वाहतूक कोंडीत पुन्हा अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
