आठवीच्या विद्यार्थिनीला उलथन्याने दिले 40 फटके, शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल

विद्यार्थ्याने गृहपाठ पूर्ण केला नाही किंवा शिक्षकाचे ऐकले नाही तर त्याला शिक्षकाकडून निर्घृण पद्धतीने मार दिल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात. अशीच आणखी एक बातमी समोर आली आहे. ही घटना मुंबईतील घणसोली भागातील गोठीवली या गावातील आहे. घरगुती शिकवणीला जाणाऱ्या एका विद्यार्थ्यीनीने पाढे पाठ न केल्याने ट्युशन टीचरने  चपाती उलटी करण्याच्या उलथन्याने तब्बल 40 फटके मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ट्युशन टीचरबाबत रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार

रहिवासी पूनम वकडे यांची मुलगी घरगुती शिकवणीला जाते. घरगुती शिकवणी घेणाऱ्या ट्युशन टीचरने विद्यार्थ्यांना पाढे पाठ करण्यास सांगितले होते. मात्र पाढे पाठ न केल्याने या आठवीतील विद्यार्थिनीला चपाती उलटी करण्याच्या उलथन्याने तब्बल 40 फटके मारले. एवढे फटके हातावर मारल्याने विद्यार्थिनीच्या हाताला सूज येऊन लाल चट्टे आले असून विद्यार्थिनीला प्रचंड वेदना होत आहेत. याप्रकरणी ट्युशन टीचरला जाब विचारला असता तुमची मुलगी अभ्यास करत नाही इतर मुलांना देखिल फटके दिले असून याचा त्रास होत असेल तर दुसऱ्या ट्युशनला पाठवा अश्याप्रकारची अरेरावीची भाषा करत उत्तरे देण्यात आली. दरम्यान या संदर्भात विद्यार्थीनीच्या कुटुंबियांकडून रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबईत गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण 

दरम्यान, काहीदिवसांपूर्वी मुंबईत अशीच एक घटना घडली होती. टिळकनगर परिसरात राहणाऱ्या 20 वर्षीय जन्मापासून गतिमंद असलेल्या विद्यार्थ्याला मारहाणी प्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुलभा व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर केंद्रातून परतल्यानंतर प्रशिक्षक गर्गे यांनी त्याला मारहाण केली. मारहाणीमुळे मुलाचा डावा कान दुखू लागला, शरीरही ठणकू लागले. दुखापत झाल्याने मुलाच्या आईने संबंधित केंद्रातील मुख्याध्यापकांकडे तक्रार केली असता त्यांनी ही तक्रार गांभीर्याने घेत अंतर्गत चौकशी केली. त्यानंतर मारहाणी प्रकरणातील शिक्षकाची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. तक्रारीनुसार, शिक्षकाविरोधात अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियमातील कलम ९२-ब आणि भारतीय न्याय संहितेतील कलम 115-2 नुसार गुन्हा नोंदवला गेला आहे.

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाणीबाबत भारतीय कायद्यात कोणत्या तरतुदी आहेत? 

शाळेत किंवा महाविद्यालयात शिक्षकांकडून होणाऱ्या मारहाणीबाबत भारतीय कायद्यात अत्यंत कडक तरतुदी आहेत. 

 

  • बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE Act, 2009) काद्यातील कलम 17 नुसार कोणत्याही मुलाला शारीरिक दंड किंवा मानसिक त्रास देणे योग्य मानले जात नाही. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.
  • किशोर न्याय कायद्याच्या (Juvenile Justice Act, 2015) कलम 75 नुसार जर एखाद्या संस्थेच्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्याने मुलाला शारीरिक इजा पोहोचवली, तर त्याला 3 वर्षांचा कारावास किंवा 5 लाखांपर्यंतचा दंड भरावा लागेल.
  • भारतीय न्याय संहितेनुसार शिक्षकांच्या मारहाणीमुळे गंभीर इजा झाल्यास पोलीस शिक्षकावर पोलीसांकडून कलम 115 नुसार स्वेच्छेने दुखापत करणे, कलम 118 नुसार धोकादायक शस्त्राने मारहाण करून दुखापत करणे हे गन्हे दाखल केले जाऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *