दमण येथे फिरायला गेल्यानंतर चुलत भावाची शर्टने गळा आवळून हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरून आजन्म सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या एका व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष ठरवले आहे. त्यामुळे सव्वासात वर्षांच्या तुरुंगावासानंतर सुटकेचा दिलासा मिळाला आहे.
भैयालाल सिंह असे त्याचे नाव असून ऑक्टोबर-२०१८ मध्ये अटक झाल्यापासून तो तुरुंगात होता. अन्य कोणत्या गुन्ह्याच्या प्रकरणात आवश्यकता नसल्यास त्याची त्वरित सुटका करावी, असे निर्देश न्या. सारंग कोतवाल व न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने छ. संभाजीनगर तुरुंग प्रशासनाला दिले.
काय घडलं होतं?
सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, भैय्यालाल हा त्याचा चुलत भाऊ रामलखन व साथीदार आसन सिंग सुग्रीव यांच्यासोबत २ ऑक्टोबर २०१८ रोजी फिरण्यासाठी दमण येथे गेला होता. तेथील समुद्रकिनारी फेरफटका मारून फोटोग्राफरकडून फोटो काढून घेतल्यानंतर रामलखन व भैयालाल यांच्यात भांडण झाले. त्यावेळी भैयालालने रामलखनचा गळा आवळून त्याची हत्या केली. मद्याच्या अंमलाखाली असलेला सुग्रीव झोपला होता. भैयालालने जागे केल्यानंतर त्याला जाग आली, तेव्हा रामलखन कुठे दिसत नव्हता आणि भैयालालच्या अंगावर शर्ट नव्हता. रामलखन आधीच निघून गेल्याचे भैयालालने सांगितले.
दुसऱ्या दिवशी सुग्रीवने मोबाइलवर खूप प्रयत्न करूनही रामलखनशी संपर्क होऊ शकला नाही. त्याचदिवशी पोलिसांचा त्याला दूरध्वनी आला आणि दमण पॉलिटेक्निक येथे रामलखनचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या अंगावर शर्ट गुंडाळलेला होता. भैयालालसोबतचा फोटोही तेथे पडलेला होता. नंतर पोलिसांना भैयालालच्या खोलीत रामलखनचे आधार कार्डही सापडले. तसेच, रासायनिक विश्लेषणात भैयालालच्या कपड्यांवरील चिखल घटनास्थळावरील चिखलाशी जुळला.
या साऱ्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी खटला चालवल्यानंतर दमण सत्र न्यायालयाने भैयालालला १४ जुलै २०२२ रोजी दोषी ठरवत शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात त्याने अपील केले होते. त्याची बाजू मांडण्यासाठी उच्च न्यायालयाने ॲड. आशीष सातपुते यांची नेमणूक केली होती.
‘मी हा गुन्हा केला नसल्याचा’ भैयालालचा दावा होता. तर सरकारी पक्षाने सुग्रीव, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह नऊ जणांच्या साक्षी नोंदवून भैयालालच खूनी असल्याचा दावा केला. मात्र, ‘घटनेच्या वेळी मद्याच्या अंमलाखाली असल्याचे सुग्रीवने उलटतपासणीमध्ये मान्य केले. त्याच्या माहितीत विसंगती आहे आणि घटनाक्रमाची साखळी जुळत नाही. दोन ऑक्टोबरला मृतदेह सापडला असताना शवविच्छेदन नऊ ऑक्टोबरला करण्यात आले.
त्या अहवालातील मृत्यूबाबतच्या अंदाजाची वेळ एफआयआरमधील वेळेशी जुळत नाही. तसेच रामलखनला अखेरचे भैयालालसोबत पाहण्यात आल्याचा दावा असला तरी तिघे ज्याठिकाणी रिक्षातून एकत्र उतरले त्याविषयी कोणताही पुरावा नाही. आरोपी चिखलाने माखलेले कपडे खोलीत तसेच का ठेवेल, याचे उत्तर मिळत नाही. अशा विविध विसंगतींमुळे भैयालालनेच हत्या केल्याचे सिद्ध करणारे निर्विवाद पुरावे नाही’, असे निरीक्षण खंडपीठाने निर्णयात नोंदवले.
