कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उचत येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादाने अत्यंत निर्दयी पातळी गाठली. घरातील बॅगेत ठेवलेल्या पैशांबाबत संशय घेत मुलानेच स्वतःच्या 85 वर्षीय वृद्ध वडिलांचा डोक्यावर वार करून खून केला. माजी सैनिक दत्ताराम संभाजी केसरकर (वय 85) असे मृताचे नाव असून, संशयित आरोपी मुलगा संतोष दत्ताराम केसरकर (वय 40) याला शाहूवाडी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात उचत गावी केसरकर कुटुंब राहते. कुटुंबातील संतोष केसरकर हा कोल्हापुरात नोकरीला असून त्याला दारूचे व्यसन आहे. गुरुवारी संतोष हा कोल्हापूर येथील नोकरीला निघाला होता. तेव्हा घरातील बॅगेत ठेवलेले 9 हजार रुपये सापडत नसल्याने त्याने पत्नी साधना, वडील दत्ताराम आणि कुटुंबीयांवर संशय व्यक्त केला. यावरून घरात जोरदार वाद झाला आणि “मी कामावरून परत येईपर्यंत पैसे मिळाले नाहीत. तर कोणालाही सोडणार नाही,” अशी धमकी देत संतोष घराबाहेर पडला.
डोक्यात घातला दगडी वरवंटा..
सायंकाळी, संतोष त्याच्या पत्नीसह लहान मुलीच्या शाळेतील स्नेहसंमेलनासाठी मलकापूरला गेला. घरात दत्ताराम केसरकर एकटेच होते. पैसे सापडले नसल्याचा राग संतोषच्या मनात तसाच होता. कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून तो घरी पुन्हा आला आणि वडिलांशी पैसे घेतल्यावरून वाद घालू लागला. वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात संतोषने दगडी वरवंट्याने वडिलांच्या डोक्यात वर्मी घाव घातला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन दत्ताराम खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न..
खूनानंतर घाबरलेल्या संतोषने फरशीवर सांडलेले रक्त ओढणीने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीय स्नेहसंमेलनातून घरी परतल्यावर घटना उघडकीस आली. परिसरातील नागरिकांनी सतर्क होऊन संतोषला पकडले आणि शाहूवाडी पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याबाबतची फिर्याद साधना संतोष केसरकर यांनी दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी सैनिक दत्ताराम यांचा दुर्दैवी मृत्यू..
मनमिळाऊ स्वभावाचे दत्ताराम केसरकर हे सामाजिक कार्यात सक्रिय आणि नातवांच्या शिक्षणाचे स्वप्न बाळगणारे हे ‘कॅप्टन’ म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व होते. दुर्दैवी योगायोग असा की, त्यांना दोन मुले असून एक मुलगा अनेक वर्षांपासून गाव सोडून त्याने घराच्या जबाबदारीतून अंग काढून घेतले आहे. तर सोबत राहणाऱ्या दुसऱ्या मुलानेच पैशाच्या लोभात हे कृत्य केले. मूळचे गावडी गावातील असलेल्या दत्ताराम यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे उचत गाव आणि परिसर हादरला असून, संताप व्यक्त केला जात आहे.
