राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे धाकटे पुत्र तेजस ठाकरेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील चार दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी त्यांना एच. एन. रिलायन्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
तेजस ठाकरेंना झालंय काय?
तेजस ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याने बुधवारी गिरगांव येथील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु असून आता तब्येतीत सुधारणा झाल्याची माहिती आहे. तेजस ठाकरे यांना ताप असल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढले
मुंबईत सध्या तापाची कोणतीही साथ नाही. मात्र सातत्याने बदलते हवामान, प्रदूषण पातळीतील वाढ आणि विषाणूंचा वेगवान प्रसार होत असल्यामुळे शहरातील व्हायरल फिवरच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डॉक्टर आणि क्लिनिक्समध्ये दररोज 10 ते 20 रुग्ण व्हायरल फिव्हर म्हणजेच ताप, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, गळ्यात खवखव होणे आणि खोकल्यासारख्या लक्षणांच्या तक्रारी घेऊन उपचारांसाठी येत आहेत.
आजारांची मुख्य लक्षणे कोणती?
सध्या मुंबईत दिसून येत असलेल्या व्हायरल आजारांची मुख्य लक्षणे पुढील प्रमाणे आहेत.
उच्च ताप – शरीराचे तापमान अचानक प्रचंड वाढते.
अंगदुखी आणि थकवा – अंग दुखू लागते आणि प्रचंड थकल्यासारखं वाटतं.
डोकेदुखी – डोकं भनभनल्यासारखं होतं.
गळ्यात दुखणे किंवा खवखव – घशात खवखवत जावणते.
खोकला आणि श्वास घेण्यात त्रास (काही केसेसमध्ये) – अनेकदा घशातील खवखव आणि खोकला अशी दुहेरी लक्षणं दिसून येतात.
व्हायरल आजारांची कारणे:
हिवाळ्यातील थंड हवा आणि प्रदूषणामुळे श्वसनमार्गाच्या संसर्गात वाढ होते.
व्हायरल इन्फेक्शन इन्फ्लुएन्झा किंवा सामान्य सर्दी या काळात हवेमार्फत वेगाने पसरते.
हवामानातील बदलामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने एकाच वेळेस अनेक लोक या संसर्गाच्या चपाट्यात येतात.
डॉक्टरांचा सल्ला काय?
ताप किंवा लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना भेटा आणि योग्य औषधोपचार घ्या. घरच्या घरी स्वत: औषधोपचार टाळा.
सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला, हात स्वच्छ ठेवा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
भरपूर पाणी प्या, आराम करा आणि पौष्टिक आहार घ्या.
