दीड महिन्यापूर्वी पतीचं निधन, पत्नीचा बेडरुममध्ये संशयास्पद मृत्यू, कोल्हापुरात खळबळ, घातपाताच्या चर्चा

कोल्हापूर शहरातील अगदी वर्दळीच्या गंगावेश परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आपल्याच राहत्या घरी बेडरुममध्ये संशयास्पदरित्या आढळून आला. काहीच दिवसांपूर्वी महिलेच्या पतीचे निधन झाले होते. मूल नसल्याने घरी पती पत्नी दोघेच राहत होते. त्यातच पतीच्या निधनानंतर अशा पद्धतीने महिलेचा मृत्यू झाल्याने घातपाताच्या चर्चांना उधाण आले आहे.

कोल्हापुरातील गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या उषा मारुती भिऊंगडे (वय 69) यांचा सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास बेडरूममध्ये संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. पतीचे 30 डिसेंबर 2025 रोजी निधन झाल्याने एकट्याच राहणाऱ्या या वृद्ध महिलेच्या मृत्यूमुळे परिसरात कुणाकडेही संशय नसला तरी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. उत्तरीय तपासणीनंतर व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने राखीव ठेवले असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

एकटेपणातील वृद्धेची दुर्दैवी कहाणी

उषा भिऊंगडे या मूळ फुलेवाडी रिंगरोड येथील परशुराम भिऊंगडे यांच्या चुलत बहिणी होत्या. मूलबाळ नसल्याने पतीच्या जाण्यानंतर त्या स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. पुतण्या परशुराम रोज त्यांची भेट घेऊन औषधे आणि गरजा पुरवित असे. रविवारी (१५ फेब्रुवारी) रात्री त्याने त्यांची तब्येत बरी नसल्याने औषधे देऊन घरी परतला होता. सोमवारी सकाळी कामानिमित्त शाहूवाडी तालुक्यात गेल्यावर त्याने उषा यांच्या मोबाइलवर कॉल केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. चिंतेतून शेजाऱ्यांना फोन करून घराची चौकशी करण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले तेव्हा उषा बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळल्या. या घटनेने कुटुंबीय आणि शेजारी हादरले.

पोलिसांकडून कसून तपास सुरु

लक्ष्मीपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घरातील सर्व दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू पूर्णपणे सुरक्षित आढळल्या. वृद्धेच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा व्रण दिसले नाहीत. तरीही खबरदारी म्हणून ठसेतज्ज्ञांना बोलावून घरातील वस्तू, दरवाजे, खिडक्यांवरील ठसे घेण्यात आले. स्थानिक गुन्हेगार अन्वेषण शाखा (सीआयडी), फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि शहर पोलिस उपाधीक्षक प्रिया पाटील, सीआयडीचे निरीक्षक सुशांत चव्हाण, लक्ष्मीपुरी पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्या पथकाने घटनास्थळाची कसून पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला. पोलिसांनी शेजारी, नातेवाईक आणि परिसरातील संशयितांची चौकशी सुरू केली असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

हृदयविकाराचा प्राथमिक अंदाज

प्राथमिक तपासात झोपेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, संशयास्पद परिस्थितीमुळे व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. “अहवालाची प्रतीक्षा आहे. नेमके कारण तेव्हाच कळेल,” असे लक्ष्मीपुरी पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांनी सांगितले. या घटनेमुळे गंगावेश परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, एकट्या वृद्धांची काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवली असून, तपासांअंती सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *