पतीच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच आपल्या एखाद्या मंत्र्यासंदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त केल्याची महिती समोर येत आहे. स्वतःच्या आणि पक्षाच्या प्रतिमेची काळजी घेण्याचा सल्ला द्याव्या लागण्याची वेळ सुनेत्रा पवारांवर कोणी आणली आणि नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात…
नेमकं हे प्रकरण काय?
मंत्रालयात 35 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली भ्रष्टाचार विरोधी ब्युरोने 12 फेब्रुवारी रोजी थेट मंत्रालयातून एकाला अटक केली. अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) मधील एका लिपिकाने लातूरच्या एका मेडिकल स्टोअर चालकाकडून निलंबित परवाना परत मिळवल्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात या स्टोअर चालकाने एसीबीकडे लेखी तक्रार केली. 12 फेब्रुवारी रोजी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर अन्न व औषध प्रशासन (FDA) मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दलानाजवळ एसीबीने लावलेल्या सापळ्यात राजेंद्र ढेरंगे यांना लाच घेताना पकडण्यात आले. लाच स्वीकारताना सीसीटीव्ही फुटेज आणि पुराव्यांसहीत ही कारवाई करण्यात आली. लिपिकाने झिरवाळ यांच्या व्यक्तिगत सचिव (PS) चे नाव घेतल्याचीही चर्चा असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. याच प्रकरणावरुन आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी झिरवाळ यांना पक्षाच्या बैठकीत सुनावल्याची माहिती समोर येत आहे.
कोणाबद्दल नाराजी व्यक्त केली? अन् काय म्हणाल्या?
सुनेत्रा पवार यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागामध्ये समोर आलेल्या लाचखोरी प्रकरणी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. सोमवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटी मीटिंगमध्ये झिरवाळ यांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणावर चर्चा झाली. स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा काळजी घ्यावी, असं म्हणत सुनेत्रा पवारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. प्रशासनातील अधिकाऱ्यांमुळे स्वत:ची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याविषयी खबरदारी घ्या, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी झिरवाळ यांना दिल्या. सुनेत्रा पवारांबरोबरच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी झिरवाळ यांना या प्रकरणामध्ये सूचना केल्या. झिरवाळ यांनी कोअर कमिटी मीटिंगमध्ये सुनेत्रा पवार तसंच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी भेट घेतली तेव्हा ही नाराजी व्यक्त केली गेली असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
प्रकरण समोर आल्यानंतर झिरवाळ यांनी काय भूमिका घेतलेली?
माझ्या कार्यालयात भ्रष्टाचाराला थारा नाही. चौकशीत माझा संबंध सिद्ध झाला तर मी राजीनामा देईन, अशी रोखठोक भूमिका झिरवाळ यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना घेतली. लिपिकाची प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी झिरवाळ यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे केली आहे. विभागीय दक्षता पथकाला पूर्ण चौकशी करण्याचे आदेश झिरवाळ यांनी दिले. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्यावर निशाणा साधला. “नैतिक जबाबदारी घेऊन मंत्री तात्काळ राजीनामा द्यावा,” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
घरावर धाड
तीन दिवसांच्या पोलिस कोठडी संपल्यानंतर ढेरंगेला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. चालू चौकशीचा भाग म्हणून एजन्सीने त्याच्या मालमत्तेची आणि बचतीची अधिक चौकशी सुरू केली आहे. लाचखोर लिपिकाच्या नाशिकातील घरावरही एसीबीने धाड टाकली. या कारवाईदरम्यान लिपिकाच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
