नोकरदारांसाठी एसटीची ‘शिमगा भेट’, 8 आगारांतून सुटणार जादा बस

ठाणे होळीच्या पारंपरिक शिमगोत्सवाची (Shimga) तयारी कोकणात (Kokan) सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे आणि परिसरात स्थायिक नोकरी-व्यवसायानिमित्त झालेला नोकरदार वर्षातून एकदा तरी गावची ओढ भागवण्यासाठी हमखास कोकणात जातो. विशेषतः होळीच्या काळात देवाची पालखी नाचवणे, ग्रामदैवतांची पूजा, पारंपरिक खेळ, फागोत्सव आणि सामाजिक एकोपा अनुभवण्यासाठी कोकणी गाव गाठतो. तेव्हा एसटीच्या (ST Buses) वतीने होळी आणि शिमग्याची जादा बसेस चालवल्या जाणार आहेत.

8 आगारांतून सुटणार जादा बस : 

ठाणे एसटी विभाग नोकरदारांना नेण्यासाठी सज्ज झाली आहे. ठाणे एसटी विभागांतर्गत आठ आगारांतून जादा बस सोडण्यात येणार आहेत. यात बोरीवली आगार 17, भाईंदर आगार 3, ठाणे खोपट आगार 21, कल्याण आगार 17, तसेच विठ्ठलवाडी बस आगारातून 21 जादा बस असणार आहेत. कोकणात जाणार 75 जादा बस ठाणे एसटी विभागाच्या विविध आगारांतून कोकणातील दापोली, खेड, चिपळूण, गुहागर तसेच रायगड जिल्ह्यातील महाड या प्रमुख ठिकाणांसाठी नियमित बस सेवेव्यतिरिक्त एकूण 75 जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेत प्रवास करता यावा यासाठी जादा गाड्धा ‘रातराणी’ प्रकारातील आहे. त्यामध्ये टू-बाय-टू आसन व्यवस्था उपलब्ध असणार आहे.

ग्रुप बुकिंगची स्वतंत्र सुविधा : 

विशेष बससेवेच्या आगाऊ तिकीट बुकिंगची सुविधा संगणकीय (ऑनलाइन) तसेच ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुकिंगची प्रक्रिया २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत सुरू राहणार आहे. याशिवाय गटाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ग्रुप बुकिंगची स्वतंत्र सोय केली आहे. सध्या तरी एकही बसचे ग्रुप बुकिंग झाले नसल्याची माहिती ठाणे एसटी वाहतूक विभागाने दिली.

कोकण रेल्वे मार्गावर 8 खास फेऱ्या : 

मध्य रेल्वेने मुंबई-सावंतवाडी रोड दरम्यान एकूण 8 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रत्येकी दोन फेऱ्या (दोन्ही बाजूंसह) चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष गाड्यांचे आरक्षण बुधवार 18 फेब्रुवारीपासून आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू होणार आहे. आरक्षित नसलेल्या डब्यांसाठी तिकीट बुकिंग युटीएस प्रणालीद्वारे तसेच रेल वन अॅपद्वारे करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *