बारामतीतील कॉलेजमध्ये संतापजनक घटना: शिक्षकाचा इंजिनियरिंगच्या विद्यार्थिनींना अश्लील मेसेज, शिकवताना चुकीचा स्पर्श अन्…

बारामती तालुक्यातील माळेगाव येथील एका डिप्लोमा इंजिनियरिंग महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर महाविद्यालयातील एका प्राध्यापकावर अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पालकवर्गात संताप आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नितीन शंकर तावरे (वय ४२, रा. सांगवी ता. बारामती) असे आरोपी प्राध्यापकाचे नाव असून त्यांच्याविरुद्ध प्राचार्य संदीप रमेश शहा यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, नितीन शंकर तावरे या प्राध्यापकाने प्रथम वर्षातील अल्पवयीन विद्यार्थिनींना त्यांच्या इच्छेविरुद्ध व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील संदेश पाठवले. संदेशांना प्रतिसाद न दिल्यास अंतर्गत मूल्यमापनातील ३० गुण न देण्याची धमकी देण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आलं होतं. तसेच वर्गात शिकवताना विद्यार्थिनींना अयोग्य स्पर्श करणे, जवळ जाण्याचा प्रयत्न करणे आणि विरोध केल्यास वर्गात अपमानास्पद वर्तन करणे असे प्रकार या नराधम शिक्षकाने २२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

बारामतीतील महाविद्यालयातील हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर पीडित विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन घडलेला प्रकार मांडला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थेला तात्काळ तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. त्यानंतर पोलिसांनी पोक्सोसह इतर कलमान्वये आरोपी शिक्षकावर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास उपनिरीक्षक देविदास साळवे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *