राज्यभरात आता हिवाळ्याकडून उन्हाळ्याच्या दिशेने ऋतुबदलाला सुरुवात झाली आहे. वाऱ्यांची दिशाही बदलत असून, तापमानामध्ये चढ-उतार अनुभवायला मिळत आहेत. भारतीय हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आज, सोमवारी तुरळक ठिकाणी उष्मा आणि आर्द्रतापूर्ण वातावरणाचा ‘यलो ॲलर्ट’ दिला आहे. राज्यात दिवसभरात मुंबईत सांताक्रूझ येथे सर्वाधिक कमाल तापमान नोंदले गेले.
रत्नागिरीमध्ये रविवारी ३४.७ अंश से. कमाल तापमान नोंदले गेले. ते सरासरीपेक्षा ३.१ अंश अधिक होते. हर्णे येथे तापमानाचा पारा फारसा चढा नव्हता, मात्र येथे सकाळी ९७ टक्के, तर संध्याकाळी ७७ टक्के आर्द्रता नोंदली गेली. मुंबईतही कुलाबा येथे ९१, तर सांताक्रूझ येथे ८१ टक्के आर्द्रता रविवारी नोंदली गेली. मुंबईमध्ये दुपारनंतर आर्द्रतेचे प्रमाण कमी होते; परंतु पारा चढा होता. सांताक्रूझ येथे ३५.२ अंश से., तर कुलाबा येथे ३३ अंश से. कमाल तापमान नोंदले गेले. हे सरासरीपेक्षा अनुक्रमे ३.६ आणि २.८ अंशांनी अधिक होते.
मुंबईमध्ये कसं असेल तापमान?
मुंबईमध्ये सोमवारीही कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास असेल, असा अंदाज आहे. दुपारनंतर किंवा संध्याकाळी आभाळ अंशतः ढगाळ असू शकेल. १७ फेब्रुवारी रोजीही आभाळ अंशतः ढगाळ असेल. मुंबईमध्ये आर्द्रता वाढल्याने किमान तापमानाचा पाराही चढला आहे. सांताक्रूझ येथे २१, तर कुलाबा येथे रविवारी २२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे किमान तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे २.६ आणि २.७ अंशांनी अधिक होते.
पुढील 48 तास महत्त्वाचे
पुढील ४८ तासांमध्ये कोकण विभागात कमाल तापमानामध्ये एक ते दोन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यापुढील चार दिवस तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. या दिवसांमध्ये कोकणाच्या काही भागांमध्ये ३५ ते ३७ अंशांपर्यंत तापमान जाऊ शकेल, आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यानंतर किमान तापमान खाली येऊ शकेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला.
