शहरातील चिकलठाणा परिसरातील मूर्तीजापूर येथे एका चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. माणुसकी दाखवून भिक्षेकरी महिलेला काल महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त साबुदाणा खिचडी खायला देणाऱ्या 10 वर्षांच्या मुलीलाच पळवून नेण्याचा प्रयत्न या महिलांनी केला. मात्र, मुलीच्या आईची सतर्कता आणि नागरिकांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला असून सतर्क नागरिकांनी आरोपी महिलांना एमआयडीसी सिडको पोलिसांच्य ताब्यात दिलं आहे.
नेमका प्रकार काय?
मूर्तीजापूर येथील म्हाडा कॉलनी परिसरात रविवारी १५ फेब्रुवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी ८ वाजेपासून परिसरात रिक्षाने आलेल्या ३ ते ४ भिक्षेकरी महिला घराघरात डोकावून पाहणी करत होत्या. सायंकाळी एका १० वर्षांच्या मुलीने एका महिलेला माणुसकीच्या नात्याने साबुदाणा खिचडी खायला दिली. तेव्हा त्या महिलेने, तुझ्या गळ्यातील सोन्याची चैन छान आहे, ती मला दे अशी मागणी केली. मुलीने नकार देताच महिलेने तिचा हात धरून चल माझ्यासोबत म्हणत ओढत नेण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईने हा प्रकार पाहताच आरडाओरड केली, ज्यामुळे परिसरातील नागरिक तातडीने जमा झाले. पळून जाणाऱ्या तिन्ही भिक्षेकरी महिलांना नागरिकांनी पकडून ठेवले आणि त्यांना चोप दिला. त्यानंतर नगरसेवक मनोज गांगवे व दीपक खोतकर यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे.
केंब्रिज परिसरात ठोकलेत तंबू
पोलीस तपासात समोर आलं आहे की, या महिला केंब्रिज परिसरातील मोकळ्या मैदानात तंबू ठोकून राहत आहेत. दिवसा शहराच्या विविध भागात रिक्षाने फिरून त्या भिक्षा मागण्याचे काम करतात आणि घरांची पाहणी करतात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
