22 वर्षीय तरुणीची बॉडी तलावात तरंगताना आढळली; पोलिसांना तो संशय, नेमकं काय घडलं?

कर्जत तालुक्यातील पळसदरी येथील धरणामध्ये एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह रविवारी दुपारच्या सुमारास बाहेर काढण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पळसदरी येथील धरणामध्ये दुपारी ३.३०च्या सुमारास एक मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिक पोलिस पाटील विनायक खोपकर यांनी दिल्यानंतर कर्जत पोलिस घटनास्थळी पोहोचले. हा मृतदेह एका तरुणीचा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ खोपोली येथील बचाव पथकाला पाचरण करून मृतदेह बाहेर काढला. मृत तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही तरुणी इथे कशी व कोणासोबत पोहोचली, तिचा मृत्यू हा अपघात आहे की; घातपात याचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिसांना कोणता संशय?

धरणामध्ये मृतावस्थेत आढळलेल्या तरुणीची अद्याप ओळख पटली नसली तरी सदर तरुणी कर्जत तालुक्याबाहेरची असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या तरुणीची ओळख पठवण्यासाठी पोलिसांकडून आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांसोबत संपर्क साधला जात असून बेपत्ता असलेल्या व्यक्तींच्या अनुषंगाने तपास केला जात आहे. तसंच या तरुणीची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियाचाही आधार घेतला जात असल्याचे समजते.

व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर तपास

शनिवारी व्हॅलेंटाईन डे होता. या दिवशी अनेक तरुण-तरुणी फिरण्यासाठी बाहेर पडतात. कधीकधी एकतर्फी प्रेमातून वाद होऊन हत्येच्या घटनाही घडत असतात. या पार्श्वभूमीवर व्हॅलेंटाईन डेला सदर तरुणीचा घातपात तर करण्यात आला नाही ना, याबाबतही पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. या तरुणीचा मृत्यू नेमका कसा झाला, तिचा खून करण्यात आला की तिने स्वत:हूनच आपलं जीवन संपवलं, याबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *