रेल्वे अपघातांची संख्या शून्य होणार, पुण्यात 250 किमी रेल्वे मार्गिकेवर ‘कवच’ प्रणाली; दौंड-मनमाड यशस्वी चाचण्या

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने भारताच्या स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली ‘कवच’च्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. पुणे विभागातील ७०० किलोमीटर रेल्वेमार्गापैकी २५० मार्गावर नॉन-सिग्नलिंग कवच चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. येत्या काळात आणखी मार्गांवर या चाचण्या घेऊन कवच प्रणाली सुरू केली जाणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होण्यात मदत होणार आहे.

अपघात घटविण्याचा उद्देश

रेल्वे बोर्डाने ‘कवच’प्रणाली प्रामुख्याने रेल्वे अपघातांची संख्या शून्य करण्याच्या आणि रेल्वे प्रवासाची सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने लागू केली. हे स्वदेशी तंत्रज्ञान समोरासमोरच्या टक्कर, लाल सिग्नल ओलांडणे आणि वेग मर्यादेचे उल्लंघन रोखण्यासाठी; तसेच मानवी चुका टाळण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले आहे.

टप्प्याटप्प्याने बसविणार

ही प्रणाली सर्वत्र टप्प्याटप्प्याने बसविण्याचे काम सुरू आहे. पुणे रेल्वे विभागात सातशे किलोमीटर अंतर असून, त्या ठिकाणी कवच प्रणाली बसवण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात कवचच्या चाचण्यांमध्ये पुणे-कोल्हापूर, दौंड-मनमाड या मार्गाचा समावेश आहे. या ठिकाणच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. कवच टप्पा-२ अंतर्गत पढेगाव, बेलापूर आणि राहुरी या तीन स्थानकांवर प्रणालीची स्थापना पूर्ण झाली आहे; तसेच दौंड-येवला विभागात स्थापनेचे काम वेगाने सुरू आहे. दूरसंचार पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नियोजित १२३ टॉवरपैकी ५३ कवच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात आणखी मार्गावर कवच प्रणालीचे काम वेगाने सुरू आहे.

नोव्हेंबरमध्ये काम सुरू

रेल्वे बोर्डाच्या निर्देशांनुसार लोकोमोटिव्हमध्ये कवच प्रणाली बसवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. पुणे डिझेल व इलेक्ट्रिक लोको शेड येथे हे काम गेल्या नोव्हेंबर महिन्यात सुरू केले होते. त्यानंतर अवघ्या १८ दिवसांत त्याचे काम पूर्ण करण्यात आले. या कालावधीत वॅप-७ प्रकारातील चार लोकोमोटिव्हमध्ये कवच प्रणाली यशस्वीरीत्या बसवून तपासणीनंतर सेवेसाठी सोडण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *