लोणावळा येथे पती-पत्नीतील वाद किती टोकाला जाऊ शकतो याचे हृदयद्रावक उदाहरण समोर आलं आहे. पत्नीने रागाच्या भरात पतीचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यानंतर नैराश्यात गेलेल्या पतीने 250 फूट खोल दरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत पतीचं नाव विरेंद्र सिन्हा (मूळ रहिवासी पश्चिम बंगाल) असं असून तो सध्या हिंजवडी येथे नोकरी करत होते. ते कंटेनर विक्री करणाऱ्या कंपनीत सेल्स विभागात कार्यरत होते.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून विरेंद्र आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद सुरू होते. 7 फेब्रुवारी शनिवारी रोजी दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर 10 फेब्रुवारी मंगळवारी रोजी पत्नी हिंजवडीहून माहेरी निघून गेली. काल गुरुवारी रोजी पत्नीचा वाढदिवस होता. मध्यरात्रीपासून विरेंद्र पत्नीला फोन करत होते; मात्र, तिने नंबर ब्लॉक केल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. पहाटे 5 ते 6च्या सुमारास त्याने पत्नीला टेक्स्ट मेसेज आणि व्हिडिओ मेल पाठवून आत्महत्या करत असल्याचं कळवलं.
पत्नीने मेसेज पाहून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. विरेंद्र सिन्हा यांनी टायगर पॉइंट येथून सुमारे 200 ते 250 फूट खोल दरीत उडी घेतली होती. अथक प्रयत्नानंतर विरेंद्र सिन्हा यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. स्थानिक बचाव पथक शिवदुर्ग लोणावळा मित्र यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. विरेंद्र यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. पत्नीच्या वाढदिवशीच पतीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यातही याच परिसरात एका उच्चशिक्षित तरुणीने आत्महत्या केली होती. त्यामुळे टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट अशा धोकादायक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवणे आणि स्थानिक नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे बोललं जात आहे.
