गॅसबिल भरले नाही, भरलेले बिल अपडेट झाले नाही, तुमचे कनेक्शन रात्री कापण्यात येईल, असे वेगवेगळे खोटे संदेश पाठवून सर्वसामान्यांना जाळ्यात ओढले जाते. एखादी लिंक किंवा ॲप डाउनलोड करून मोबाइलचा ताबा घेत लाखो रुपयांच्या रकमेवर परस्पर डल्ला मारला जात आहे.
बोरिवली पश्चिमेकडील कस्तूर पार्कमध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय गृहिणीच्या मोबाइलवर एक संदेश आला. यामध्ये आपण भरलेले गॅसचे बिल अपडेट झाले नसून ते अपडेट करण्यासाठी अमन मेहता यांच्याशी संपर्क करा, असे नमूद करण्यात आले होते. गॅस कनेक्शन तोडल्यास स्वयंपाक करणे मुश्कील होईल, असा विचार करून या गृहिणीने संदेशातील क्रमांकावर फोन केला. मेहता नावाच्या या अधिकाऱ्याने तुमचे बिल भरलेले दिसत नसून मी तुम्हाला लिंक पाठवली आहे. त्यावर जाऊन गॅसकनेक्शन तपशील आणि डेबिट कार्डची माहिती भरा, असे सांगितले. गृहिणीने लिंकवर जाऊन तपशील भरला असता तिच्या खात्यावरून पाच लाख ४५ हजार रुपये परस्पर वळविण्यात आले.
ट्रॉम्बे येथील निवृत्त बँक महिला अधिकाऱ्याला बिल अपडेट करण्यासाठी महानगर गॅसच्या नावाने संदेशातून एपीके फाइल पाठविण्यात आली. या महिला अधिकाऱ्याने एपीके फाइलवर क्लिक केले आणि कार्डाचा तपशील भरला. त्यानंतर आलेला ओटीपी टाकत पैसे भरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. दोन ते तीन वेळा प्रयत्न करूनही पैसे जात नव्हते म्हणून महिला अधिकाऱ्याने प्रयत्न थांबविले. काही वेळानंतर अडीच लाख रुपये वजा झाल्याचे एकापाठोपाठ एक संदेश आले.
विलेपार्ले येथे एकट्याच राहणाऱ्या ७४ वर्षीय वृद्धेला महानगर गॅसमधून बोलतो आहे, असे सांगून एकाने फोन केला. फोनवरील व्यक्तीने त्यांना एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. मात्र वृद्ध असल्याने तिला काहीच जमत नव्हते. समोरील अधिकाऱ्याने या महिलेला व्हिडीओ कॉल केला. त्याने ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडून दोन लाख ७९ हजार रुपये महिलेच्या नकळत काढले. दहिसर येथील ७४ वर्षीय व्यक्तीच्या खात्यामधून बिलाच्या नावाखाली ४० हजार रुपये काढण्यात आले.
हे लक्षात असू द्या…
-वैयक्तिक क्रमांकावरून येणाऱ्या एसएमएस, व्हॉट्सअॅप, संदेशाला प्रतिसाद देऊ नका
-बिल भरण्यासाठी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नये
-अधिकृत कंपनीकडून अधिकाऱ्याला संपर्क करण्याविषयी सांगितले जात नाही
-कंपनीचे जवळील कार्यालय, अथवा बिल भरणा केंद्रात जाऊन खातरजमा करा
-अॅनी डेस्क, क्विक सपोर्ट, टीम व्ह्यूअर यांसारखे अॅप डाउनलोड करू नका
-बिलाच्या पेमेंटसाठी लिंक किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करणे टाळावे
-ऑनलाइन व्यवहार करताना परिचयातील माहीतगाराची मदत घ्याव
