मुंबई लोकलमधून तरुण थेट पाण्यात पडला, मध्यरात्री सुटकेचा थरार;

धावत्या लोकल ट्रेनमधून वैतरणा नदीपात्रात एक तरुण पडल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान नदी पात्रात पडलेल्या या तरुणाला स्थानिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदत केली आणि नदीपात्रातून तरुणाला बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर येथील उद्यन वांगड हा तरुण पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू लोकल ट्रेनमधून प्रवास करत होता. पश्चिम रेल्वेच्या सफाळे ते वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या वैतरणा नदी नदीवरील पुलावरून लोकल ट्रेन जात असताना हा तरुण थेट वैतरणा नदी पात्रात पडला. मंगळवारी रात्री दहा ते अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

तरुण धावत्या लोकल ट्रेनमधून नदीपात्रात पडल्यामुळे एकच खळबळ उडाली. नदीपात्रात तरुण पडला असल्याची बाब रेल्वे कर्मचारी रमेश सिंग यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने वाढीव येथील गुरु पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती देऊन त्यांना मदतीसाठी पाचारण केले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता गुरु पाटील, साई पाटील यांच्यासह इतर सहकारी स्वतःची बोट घेऊन वैतरणा नदीपात्रात गेले. नदी पात्रात पडलेला उद्यन याने नदीपात्रात पडल्यानंतर रेल्वे पुलाच्या एका खांबाचा आधार घेतला होता. तातडीने बोटीच्या सहाय्याने तेथे जाऊन नदीपात्रात पडलेल्या उद्यन याला पाण्यातून बाहेर काढून बोटीवर घेण्यात आले. बोट नदीकिनारी आल्यानंतर उद्यन याला रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार करण्यात आले.

दरम्यान, स्थानिकांच्या आणि रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे आणि तत्परतेमुळे नदीपात्रात पडलेल्या उद्यन वांगड या तरुणाला वेळीच मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. स्थानिकांच्या धाडसी वृत्ती आणि मानवतेच्या भावनेतून केलेल्या मदतकार्याचे स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *