अजित पवार (Ajit Pawar Plane Crash Baramati) यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलं जय, पार्थ पवार यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला. पवार कुटुंबासाठी हा एक मोठा आघात असून, कर्तव्य प्रथम असं म्हणत पुन्हा मोठ्या ताकदीनं हे कुटुंब या दु:खातून सावरताना दिसलं. तिथं दुसरीकडे अनेक राजकीय घडामोडी आणि सत्तासमीकरणांनी वेग धरला. सुनेत्रा पवार यांच्यावर अजित पवारांच्या पदाची अर्थात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली. शपथविधीनंतर काहीच दिवसांनी, 10 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी अधिकृतरित्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतली आणि हा क्षण त्यांच्या मनात असंख्य भावनांचा काहूर माजवून गेल्या, ज्या अश्रूवाटे व्यक्त झाल्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातच सुनेत्रा पवारांसह पार्थ पवारही हमसून हमसून रडताना दिसले.
मंत्रालयात नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतरही महत्त्वाचे नेते उपस्थित होते. पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार थेट बारामतीत गेल्या होत्या. अजित पवार यांच्या निधनानंतरचे सर्व विधी झाल्यानंतर त्यांनी मंत्रालयात येऊन पदभार स्वीकारला, ज्यानंतर त्या कॅबिनेट बैठकीला जाणं अपेक्षित होतं.
दभार स्वीकारण्यासाठी त्या जेव्हा उपमुख्यमंत्री कार्यालयात आल्या, तेव्हा तिथं अजित पवारांच्या फोटोपुढं नतमस्तक होत त्यांनी एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. मात्र ही वेळ नियतीनं त्यांच्यावर आणली तो क्रम कुठंतरी चुकला आणि याच भावनेनं सुनेत्रा पवारांना अश्रू रोखता आले नाहीत. डोळ्यातली आसवं त्या टीपत असतानाच अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारही आईच्या सावलीप्रमाणं तिथं होते आणि त्यांनाही भावना दाटून आल्या. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी यावेळी त्यांचं सांत्वन केलं आणि त्याच खुर्चीत, त्याच कार्यालतात अजित पवारांच्या कायमस्वरुपी अनुपस्थितीत सुनेत्रा पवारांनी अतिशय भावनिक वातावरणात हा पदभार स्वीकारल्याचं पाहायला मिळालं.
पदभार स्वीकारल्यानंतरची कार्यवाही कशी?
प्रत्येक मंगळवारी अजित पवार सर्व आमदारांची बैठक घेत होते. त्यामुळे कदाचित पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर आज रात्री देवगिरी या निवासस्थानी सुनेत्रा पवार पक्षाच्या प्रमुख म्हणून पहिली बैठक घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यांच्या दिल्ली दौऱ्याचीही चर्चा आहे. फडणवीसांपाठोपाठ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर जाणारस असून, शपथविधीनंतरचा हा त्यांचा पहिलाच दिल्ली दौरा असेल. तिथं पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची त्या भेट घेणार आहेत.
