पाकिस्तानच्या देशभक्ती गीतावर नृत्य? यवतमाळच्या शाळेतील घटनेची भाजपकडून तक्रार

उमरखेड नगर परिषदेच्या एका शाळेत ३१ जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले. नगराध्यक्ष, सभापती आणि सत्तारूढ जनशक्ती पॅनलच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाल्याची तक्रार भाजपचे नगरसेवक गोपाळ कलाने यांनी पोलिसांत दिली आहे.

भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम १५२ भारताची एकता, अखंडता व सौर्वभौमत्व धोक्यात आणणारी कृत्ये सह १९६, १९७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी कलाने यांनी केली आहे. भाजपचे महामंत्री महेश काळेश्वरकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी सादर केलेले गीत हे त्यांचे देशभक्तीपर आहे. भारत-पाकिस्तान १९६५ च्या युद्धात सैनिक आणि नागरिकांना युद्धात प्रवृत्त करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी पाकिस्तानमध्ये गायले जात होते.

आजही पाकिस्तानमध्ये लष्करी व राष्ट्रीय समारंभात हे गीत गायले जाते. असे देशविरोधी गीत एका शासकीय शाळेत विद्यार्थ्यांकडून गाऊन घेणे व त्यावर नृत्य करण्यास लावणे गंभीर आहे. विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर देशविरोधी विचार रुजविण्याचा धोका आहे, असेही काळेश्वरकर यांनी म्हटले आहे. भाजप नेत्यांनी पोलिसांकडून गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करीत राहू, असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *