मुंबई आणि परिसरात फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने ‘कमाल’ केली. परिणामी यंदा उन्हाळा लवकर दाखल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. हिवाळा अजून संपला नसला तरी उन्हाळ्याच्या दिशेने वाटचालीला लवकर सुरुवात होऊ शकते, असा अंदाज आहे.
मुंबईतील आजचं हवामान
मुंबईत ३ फेब्रुवारीनंतर कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी अधिक आहे. सांताक्रूझ येथे रविवारी ३४.५, तर कुलाबा येथे ३३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे ३.६ तर कुलाबा येथे ३.७ अंशांनी सरासरीपेक्षा कमाल तापमान अधिक नोंदले गेले. किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक असून कुलाबा येथे २२, तर सांताक्रूझ येथे १९.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान अनुक्रमे २.३ आणि दोन अंशांनी सरासरीपेक्षा अधिक होते. कोकण विभागात रत्नागिरी येथे रविवारी ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान सरासरीपेक्षा ४.३ अंशांनी जास्त आहे.
उन्हाळा लवकरच होणार सुरू
या हवामानातील बदलामुळे नागरिकांना उन्हाळ्याची चाहूल लवकर लागली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, “साधारणपणे १० ते १२ फेब्रुवारीनंतर हिवाळा आणि उन्हाळा या दरम्यानचा वारे बदलाचा काळ सुरू होऊ शकतो.” मात्र, यावर्षी हा काळ लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच थंडी जाणवू लागली होती. मुंबईत इतक्या लवकर थंडी जाणवणे हे सामान्य नाही. यावरून वातावरणातील बदलाचा काळ यंदा लवकर सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कोरडे वारे वाहत आहेत. यामुळे गरम हवेच्या खालच्या थरात थंड हवा अडकून पडल्यासारखे जाणवत आहे. यामुळे तापमान वाढले आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवलीमधील हवामान
ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरातही हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मुंबईत तापमानाचा पारा वाढत असला तरी या परिसरात तापमान स्थिर होतं. आज, 9 फेब्रुवारी रोजी, कमाल तापमानात घट होऊन 30-33 अंश सेल्सियस इतकं नोंदवलं जाण्याची शक्यता आहे.
