वेटरसाठी पतीची हत्या, राजस्थानमधील हनिमून मर्डरमध्ये धक्कादायक खुलासे; मुलीचं कुटुंबच म्हणतंय ‘तिला फासावर लटकवा’

राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यात एका महिलेने आपला प्रियकर आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने पतीची हत्या केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दोन्ही कुटुंब एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होती आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये असे तीन विवाह झाले होते. या दोन्ही कुटुंबांवर शोक आणि निराशेचे सावट पसरले आहे. या घटनेचा उल्लेख आता ‘राजस्थानमधील हनिमून मर्डर’ म्हणून केला जात आहे.

सादुलशहर येथील 23 वर्षीय अंजलीचा विवाह तीन महिन्यांपूर्वी पाकिस्तान सीमेपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या 1-केएलएम गावातील 27 र्षीय आशिषसोबत झाला होता. कागदोपत्री हा आदर्श विवाह वाटत होता. आशिषने भूगर्भशास्त्रात एम.एस्सी. पूर्ण केली होती आणि तो बी.एड.ची पदवी घेत होता. अंजली एम.कॉम. करत होती आणि विशेष म्हणजे, अंजली आणि आशिषच्या कुटुंबांमध्ये घनिष्ठ संबंध होते.

लहानपणी आशिषला त्याच्या काका-काकूंनी दत्तक घेतलं होतं, त्यांना स्वत:चं मूल नव्हतं. त्यांनी त्याला प्रेमाने वाढवलं ​​आणि काही महिन्यांपूर्वी त्याच्या दत्तक आईने तिची भाची अंजलीसोबत त्याचं लग्न लावून दिलं. आशिषच्या कुटुंबीयांनी सांगितलं की अंजली त्यांच्यासोबत चांगली रुळत होती. त्यामुळेच, 30 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेमुळे ते अधिकच दुःखी आणि हादरले होते.

त्या संध्याकाळी अंजली आणि आशिष बाहेर फिरण्यासाठी बाहेर पडले होते. सोबत आशिषचा चुलत भाऊ अंकित आणि त्याची पत्नीही होती. “आम्ही नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी गावाच्या दिशेने गेलो होतो. आम्ही सहसा त्या निर्मनुष्य रस्त्याने जात नाही. पण आशिषने मला आणि माझ्या पत्नीला घरी सोडलं आणि नंतर अंजलीच्या आग्रहावरून ते त्या रस्त्याने गेले,” असं अंकितने सांगितलं.

नंतर कुटुंबाला सांगण्यात आलं की, आशिष आणि अंजली एका हिट-अँड-रनच्या घटनेनंतर बेशुद्ध अवस्थेत आढळले. आशिषला सामुदायिक आरोग्य केंद्रात मृत घोषित करण्यात आलं, तर अपघातानंतर आपले सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचं सांगणारी अंजली अधूनमधून शुद्धीवर येत होती आणि पुन्हा बेशुद्ध पडत होती.

मात्र, आशिषच्या शरीरावरील जखमा, अंजलीच्या जबाबातील विसंगती आणि पोलिसांनी केलेल्या सखोल तपासामुळे हा अपघात नसून, त्या नवविवाहितेने रचलेला खून होता असं उघड झालं. अंजलीने लग्नसमारंभात वेटर म्हणून काम करणाऱ्या तिचा पूर्वीचा प्रियकर संजूसोबत पुन्हा प्रेमसंबंध सुरू केले होते, हे तपासात उघड झालं.

संजू आणि त्याचे दोन मित्र रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमध्ये लपले होते. अंजली व आशीष तिथे पोहोचल्यावर त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. आशिषचा गळा दाबून खून केला आणि त्या हत्येला रस्ते अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. पोलीस घटनास्थळी आल्यावर अंजलीने तिचे कानातले संजूला दिले, खाली झोपली आणि बेशुद्ध झाल्याचं नाटक केलं.

आशिषच्या वडिलांनी अंजलीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. “अंजलीचे वर्तन नेहमीच सामान्य वाटायचं. ती कुटुंबात सर्वांशी मिळूनमिसळून राहायची. हत्येनंतर तिने बेशुद्ध झाल्याचं नाटक केलं आणि आमच्याशी बोलली नाही,” असं रामरख यांनी सांगितलं.

शेजाऱ्यांनी सांगितले की, अंजली सुमारे 30 किलोमीटर दूर असलेल्या श्री गंगानगर शहरात संजूला भेटली होती आणि तिच्या कुटुंबाला त्यांच्या नात्याबद्दल माहिती असावी. त्यांच्या मते, आशिषसोबतचे लग्न हा अंजलीने संजूला विसरून जावे यासाठी तिच्या कुटुंबाने केलेला एक प्रयत्न असू शकतो. परंतु लग्नानंतर घरी परतल्यावर अंजलीने पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला.

मात्र, अंजलीच्या काकांनी हा दावा फेटाळून लावला. “आम्ही पूर्णपणे हादरलो आहोत. आमचे या कुटुंबाशी 50 वर्षांपासून संबंध आहेत. आमच्या चालीरीती अशा आहेत की आम्ही आमच्या मुलींचे लग्न फक्त आमच्या ओळखीच्या कुटुंबांमध्येच लावतो. माझ्या दोन बहिणीही त्याच कुटुंबाचा भाग आहेत. आम्हाला या नात्याबद्दल काहीही कल्पना नव्हती. आम्हाला खूप लाज वाटत आहे. जर आम्हाला हे माहित असते, तर आम्ही हे लग्न होऊ देण्याऐवजी मेलो असतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

अंजली माझी भाची आहे. तिच्या वडिलांचे सुमारे 13 वर्षांपूर्वी निधन झाले. आम्हाला अंजली आणि त्या तीन पुरुषांना फाशीची शिक्षा मिळावी असे वाटते. आशिष ज्या प्रकारे तडफडून मेला… त्याच शिक्षेचा सामना तिनेही केला पाहिजे. तिने आम्हाला उद्ध्वस्त केले आहे. लोकांना कसे सामोरे जावे हेच आम्हाला कळत नाही असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *