HSRP नंबर प्लेटबाबत वाहनचालकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात अजूनही अनेक वाहनांवर हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवलेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारने ही नंबर प्लेट सुरक्षेच्या दृष्टीने बंधनकारक केली असतानाही अनेकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आता परिवहन विभागाने कडक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. डेडलाइन संपल्यानंतरही नियम न पाळणाऱ्यांवर लवकरच कारवाई सुरू होणार आहे.
HSRP नंबर प्लेट म्हणजे काय?
HSRP म्हणजे हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ही नंबर प्लेट खास तंत्रज्ञानाने तयार केली जाते, ज्यामुळे वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गुन्हेगारी प्रकरणांवर नियंत्रण मिळते. या प्लेटवर युनिक कोड आणि होलोग्राम असतो. त्यामुळे वाहनाची ओळख सोपी होते. याच कारणामुळे देशभरातील सर्व जुन्या आणि नव्या वाहनांसाठी ही प्लेट लावणे आवश्यक करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कारवाई कधीपासून सुरू होणार
महाराष्ट्रात HSRP बसवण्याची अंतिम मुदत 31 December पर्यंत देण्यात आली होती. ही तारीख उलटूनही मोठ्या संख्येने वाहनचालकांनी प्लेट बसवलेली नाही. त्यामुळे आता परिवहन विभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 18 February पासून राज्यभर तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. ज्या वाहनांवर HSRP नसेल, त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई केली जाईल.
फक्त नंबर प्लेटच नाही, कागदपत्रांचीही तपासणी
18 February पासून होणाऱ्या तपासणीत केवळ नंबर प्लेट पाहूनच वाहन सोडले जाणार नाही. वाहन थांबवल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र, वाहन विमा, PUC प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स ही कागदपत्रेही तपासली जातील. यापैकी कोणतेही कागदपत्र अपूर्ण किंवा नसल्यास वेगवेगळा दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे वाहनचालकांनी सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.
15 दिवसांची सवलत कोणाला मिळणार?
ज्या वाहनधारकांनी 31 December 2025 पूर्वी HSRP साठी ऑनलाईन नोंदणी केली आहे, पण अजून प्लेट बसवली गेलेली नाही, त्यांना 15 दिवसांची ग्रेस पिरीयड देण्यात आली आहे. अशा वाहनांवर 18 February पर्यंत कारवाई केली जाणार नाही. मात्र ज्यांनी 31 December नंतर नोंदणी केली आहे किंवा अजूनही अर्ज केलेला नाही, त्यांना दंड भरावा लागणार आहे.
किती दंड भरावा लागू शकतो?
नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांना किमान 1000 रुपयांचा दंड होऊ शकतो. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेत नंबर प्लेट बसवणे वाहनचालकांच्या हिताचे आहे.
फिटमेंट सेंटर्सची वाढती अडचण
HSRP बसवणाऱ्या फिटमेंट सेंटर्समध्ये सध्या मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. अनेक वाहनधारक अपॉइंटमेंट घेतात, पण ठरलेल्या वेळेला येत नाहीत. काहीजण कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक येतात. यामुळे तयार नंबर प्लेट्स सेंटर्समध्ये साचून राहिल्या आहेत. प्रशासन आणि फिटमेंट सेंटर्स दोघेही वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करत आहेत.
