मुंबईची लाइफलाईन असलेल्या लोकल ट्रेनसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा तीन महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. यासंदर्भातील घोषणा रेल्वे प्रशासनाकडूनच करण्यात आली आहे. नव्या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी वांद्रे-खार रेल्वेपूल पाडून त्याच्या पुनर्बांधणीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. सध्या त्याचे नियोजन सुरू असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
म रेल्वेच्या वेगवेगळ्या मार्गांवर सध्या एकाच वेळी कामं सुरु आहेत. ही कामं काही महिने तरी चालण्याची शक्यता आहे. या कामांपैकी महत्त्वाच्या कामांसंदर्भात बोलायचं झालं तर, मुंबई सेंट्रल-बोरीवलीदरम्यान नवीन मार्गिकेचे काम सध्या सुरू आहे. सध्या वांद्रे ते बोरीवलीदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका उपलब्ध झाली आहे. परंतु माहीम-सांताक्रूझ दरम्यान जागा उपलब्ध नसल्याने हे काम रखडले. खरं तर 2024 मध्ये या कामासाठी सहा महिन्यांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन होते. मात्र, प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी यासाठी हा कालावधी 3 महिने करण्यात आला. या प्रकल्पासाठी 964.84 कोटी खर्च होणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्यास मुदत देण्यात आली आहे.
सध्या या मार्गावर किती फेऱ्या धावतात?
सध्या गोरेगाव-सीएसएमटी दरम्यान 88, तर वांद्रे-सीएसएमटी दरम्यान 106 लोकल फेऱ्या आहेत. या माध्यमातून एकूण 3.62 लाख प्रवासी पश्चिम रेल्वेमधून मध्य रेल्वेकडे प्रवास करतात. यामध्ये दादर, प्रभादेवी, माहीम आणि वसई रोड मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा समावेश आहे. ब्लॉकदरम्यान गोरेगाव-सीएसएमटी विभागात लोकल सेवांमध्ये मोठी कपात करावी लागेल. परिणामी याचा फटका लाखो प्रवाशांना बसणार आहे. मात्र, या काळात वांद्रे-सीएसएमटी मर्यादित सेवा सुरू ठेवण्यात येऊ शकतात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
कमीत कमी गैरसोय व्हावी असा प्रयत्न
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी, “हा प्रकल्प महत्त्वाचा असून पूर्ण झाल्यावर रेल्वे मार्गिकेची क्षमता वाढविण्यासाठी मदत होणार आहे. काम सुरू होण्याची तारीख निश्चित झालेली नाही. परंतु प्रवाशांना कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी नियोजन करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे, असं सांगितलं.
जमीन अधिग्रहणाची सर्वात मोठी अडचण
सदर प्रकल्पातील मोठे आव्हान हे जमीन अधिग्रहणाचे आहे. महालक्ष्मी-लोअर परेल येथील शक्ती मिलच्या 88.573 चौ. मी. जमिनीचा वाद न्यायालयात आहे. तसेच वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमधील 155 प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन एमएमआरडीएकडे प्रलंबित आहे.
भविष्यासाठी ब्लॉक आवश्यक
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर चर्चगेट-बोरीवली तसेच पुढे सीएसएमटीपर्यंत लोकल सेवा अधिक सुरळीत होतील. चर्चगेट-बोरीवली-विरार दरम्यान लोकल फेऱ्यांमध्येही वाढ शक्य होणार आहे. मात्र, तोपर्यंत प्रवाशांना तीन महिन्यांच्या कठीण कालावधीसाठी तयार राहावे लागणार आहे.
राजकीय हस्तक्षेप
पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वांद्रे पूर्वेकडील बाजूला पाचवी मार्गिका काही वर्षापूर्वीच तयार करण्यात आली होती, मात्र तत्कालीन राजकीय व स्थानिक विरोधामुळे ती आजपर्यंत कार्यान्वित होऊ शकली नाही. 2017-18 दरम्यान सुमारे 10 कोटी रुपये खर्चुन ही लाइन उभारली होती. ही मार्गिका सुरू झाली असती, तर आजचा पूल पाडण्याचा प्रश्नच उद्भवला नसता आणि गोरेगाव-सीएसएमटी लोकल सेवा तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याची वेळ आली नसती, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
