नांदेडमधील एक लग्न सध्या चर्चेत आहे. नेहमीप्रमाणे लग्नाची सगळी तयारी झाली होती. पोलीस खात्यात असणारा नवरदेव लग्नाच्या आदल्या दिवशी वऱ्हाड घेऊन वधूच्या घरी पोहोचला होता. हळदीच्या कार्यक्रमात रात्री नवरदेवाने नवरीसोबत डीजेवर मनसोक्त डान्स देखील केला. पण लग्नाच्या काही तासांपूर्वीच असं काही घडलं की, सगळेच हादरले आहेत. नांदेडमध्ये लग्नाच्या काही तासापूर्वीच भलतच घडलं. बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव योगेश दत्ता घुगे सकाळी बेपत्ता झाला. विशेष म्हणजे वर आणि वधू हे दोघेही पोलीस दलात कार्यरत आहेत. या प्रकरणी किनवट पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करुन घेतली आहे.
योगेश दत्ता घुगे हा किनवट तालुक्यातील नागेशवाडी येथील रहिवासी आहे. तर मुलगी ही तालुक्यातील मदनापूर येथे वास्तव्यास आहे. दोघेही विदर्भातील चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात शिपाईपदी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी त्यांची ओळख झाली. वर्षभरापूर्वी दोन्ही कुटुंबांनी आपसात चर्चा करून लग्न ठरवलं. मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.54 वाजता किनवटच्या मदनापूर येथे वधूमंडपी त्या पोलीस उपवधू-वराचा विवाह थाटात संपन्न होणार होता.
सोमवारी हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वऱ्हाडी मंडळी घेऊन नवरदेव नवरीच्या घरी पोहोचला. हळदीच्या कार्यक्रमात रात्री एक वाजेपर्यंत नवरी आणि नवरदेवाने एकत्र डान्स देखील केला. रात्री उशिरा सर्व वऱ्हाडी झोपी गेले. इकडे लग्नघरात लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. मात्र मंगळवारी पहाटे बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरामुलगा बेपत्ता झाला. सकाळी नातेवाईक दत्ता कुठे आहे? अस एकमेकांना विचारणा करत होते. मात्र तो कुठे गेला हे कोणालाच माहिती नव्हतं. नातेवाईकांनी अनेक वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण मोबाईल बंद येतं असल्याने धाकधूक वाढली.
इकडे वधूला नवरदेव बेपत्ता झाल्याची माहिती समजताच धक्का बसला. नातेवाईकांनी शोधाशोध करूनही त्याचा सुगावा न लागल्याने अखेर कुटुंबियांनी किनवट पोलिस ठाणे गाठत वर बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करुन नवरदेवाचा शोध सुरू केला आहे. नवरदेव बेपत्ता होण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र विविध चर्चांना उधाण आलं होतं. या घटनेने किनवट तालुक्यात खळबळ उडाली आहे.
