शिवसेनेचा विरोध न जुमानता कसुरींच्या पुस्तकाचे प्रकाशन

शिवसेनेचा विरोध न जुमानता कसुरींच्या पुस्तकाचे प्रकाशन

शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या ‘नायदर अ हॉक नॉर अ डव्ह’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अखेर मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये शांततेत पार पडला.

शिवसेनेने या पुस्तक प्रकाशनाला विरोध केल्यानंतरही हा कार्यक्रम होईलच असे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांनी ठणकावून सांगितले होते. त्‍यानंतर शिवसैनिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र सायंकाळी साडेपाच वाजता सुरु होणा-या कार्यक्रमासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला विरोध दर्शवण्यासाठी आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर सोमवारी सकाळी पाच अज्ञात जणांनी रंग मिश्रित शाई फेकली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेचे समर्थन करून वातावरण तापवले होते. तसेच राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती.

मात्र, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि कुलकर्णी यांच्यासह वरळी येथील नेहरू सेंटरला पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था दिली. या कार्यक्रमासाठी नेहरू सेंटर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला काहीसा तणाव जाणवत होता. मात्र सर्व काही नियोजित वेळेत पार पडले.

दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने या पुस्तकात अनेक मुद्यांना हात घातल्याचे यावेळी कसुरी यांनी सांगितले. तर पाकिस्तानचे गझल गायक गुलाम आली यांचा कार्यक्रम शिवसेनेच्या दहशतीने रद्द झाल्यानंतरही कसुरी यांनी भारतात येण्याची हिंमत दाखवली याबाबत आपण त्यांचे धन्यवाद मानतो, अशी प्रतिक्रिया सुधींद्र कुलकर्णी यांनी दिली. तसेच सुरक्षाव्यवस्था पुरविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचेही आभार मानले.

संध्याकाळी सहानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, मुंबई जशी महाराष्ट्राची आहे. त्याचप्रमाणे ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शहरही आहे. हे लोकशाहीवादी शहर असून, मला मुंबईबद्दल आणि मराठी असल्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी ना गोली से, ना बंदूक से, बात बनेगी बोली से, हाच मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

खुर्शिद कसुरी यांनी लिहिलेल्या ‘नायदर अ हॉक नॉर अ डोव्ह’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने मुंबईत प्रकाशन आयोजित केले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेने पहिल्यापासून तीव्र विरोध केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *