प्राध्यापकाच्या मृत्यूनंतर रेल्वेला जाग! पश्चिम रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित होणार; 970000000 रुपये खर्च करुन…

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासाला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. अलीकडे घडलेल्या मालाड येथील घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, त्याच पार्श्वभूमीवर लोकल ट्रेनमधील निगराणी यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. गर्दी, गोंधळ, चोरी, छेडछाड यांसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येत आहे. या नव्या योजनेमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकल डब्यांमध्ये वाढणार सीसीटीव्हीची संख्या
पश्चिम रेल्वेच्या सुमारे 1500 एसी आणि नॉन-एसी लोकल डब्यांमध्ये तब्बल 12000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यासाठी अंदाजे 97 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत महिलांच्या डब्यांमध्येच प्राधान्याने कॅमेरे आणि टॉकबॅक यंत्रणा बसवली जात होती. मात्र आता सामान्य प्रवासी डब्यांमध्येही ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण लोकल प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
या योजनेअंतर्गत डोम आणि वेज प्रकारचे आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. या कॅमेर्यांमध्ये फेस रिकग्निशन सिस्टमचा समावेश असेल. यामुळे संशयास्पद व्यक्ती, अनुचित प्रकार किंवा गोंधळ लगेच ओळखणे शक्य होणार आहे. व्हिडिओ अॅनालिटिक्सच्या मदतीने डब्यातील गर्दीची स्थिती, हालचाली आणि संभाव्य धोके यावर सतत लक्ष ठेवले जाईल.

निविदा प्रक्रिया आणि कामाचा कालावधी
लोकल डब्यांतील सीसीटीव्हीच्या पुरवठा आणि देखभालीसाठी डिसेंबरअखेरीस नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कंत्राट मंजूर झाल्यानंतर साधारण 10 महिन्यांत सर्व डब्यांमध्ये कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. चर्चगेट ते डहाणू या 123 किमी लांबीच्या उपनगरीय मार्गावरील सर्व लोकल ट्रेनमध्ये ही प्रणाली लागू होणार आहे.

डेटा साठवणूक आणि अतिरिक्त निगराणी
या सीसीटीव्ही कॅमेर्यांमधील व्हिडिओ किमान 30 दिवस सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. गरज पडल्यास तपासासाठी हा डेटा वापरता येईल. याशिवाय मोटरमन केबिन आणि ट्रेन मॅनेजर यांच्या ठिकाणीही सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. या निर्णयामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल आणि प्रवाशांचा विश्वास आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *